कोराडी : येथील अश्विन नवरात्र उत्सवादरम्यान अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या व्यक्तींना मातेचे दर्शन अतिजलद करून देण्यासाठी ‘व्हीआयपी’ दर्शनाची सोय होती. यामुळे सामान्य भाविक दुखावल्या जात होते. यावर्षीपासून व्हीआयपी पासेसवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याने आता मातेसमोर राजा आणि रंक सारखेच असणार आहे. शिवाय यावर्षीचा नवरात्रोत्सव कडेकोट बंदोबस्तात पार पडणार आहे. यादरम्यान राजकीय व्यक्तींचे बॅनर, फ्लेक्स, फोटो व कटआऊटस् लावण्यावरही बंदी असणार आहे. महानिर्मितीच्या विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर, संस्थानचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, नगराध्यक्ष कांचन कुथे, सरपंच चंद्रशेखर बीरखेडे, महानिर्मिती, अग्निशमन, महसूल, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. अश्विन नवरात्र महोत्सवात येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त अन्य संशयितांची पोलीस कसून तपासणी करणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे कठोर पाऊल उचलले आहे. सर्व्हे क्रमांक १०४ व १०५ संरक्षण विभागाच्या अधीन असलेल्या जागेबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केल्याने ही जागा आता मंदिर संस्थानच्या अधीन झालेली आहे.यात्रेदरम्यान दुचाकी वाहनतळ व्यवस्थेचे कंत्राट कोराडी ग्रामपंचायतने काढलेले आहे. ही माहिती विभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांनी दिली. दहा दिवसीय कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा फोटो व कटआऊट लावता येणार नाही किंवा तसल्याप्रकारची परवानगी मंदिर संस्थान देणार नाही. केवळ संस्थानकडून परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवाधारकांनाच पासेस दिल्या जाणार आहे. मंदिर परिसरात १०० मीटर आतमध्ये केवळ पोलिसांद्वारे निर्देशित व्हीआयपींना येण्यास परवानगी राहणार आहे. पोलीस शिफ्टनुसार कर्तव्य बजावणार आहे. खासगी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गावर कोराडी चुंगीनाका ते कोलार नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले आहेत. महानिर्मिती वीजपुरवठा देणार आहे. खराब झालेल्या नांदा-कोराडी रस्त्यांची दुरुस्ती एल अॅण्ड टी कंपनी करणार आहे. या मार्गावर तसेच मंदिर परिसरात उच्च अश्वशक्तीचे ट्रान्सफॉर्मर लावण्याचे आदेश महानिर्मिती व वीज वितरण विभागाला दिलेले आहे. कोराडी ग्रामपंचायतच्यावतीने दोन पाण्याचे टँकर तसेच दहा प्याऊ लावले जातील. नगरपंचायत महादुलादेखील पाच प्याऊची व्यवस्था करणार आहे. परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता ३० जणांची चमू कार्यरत असणार आहे. दहा मोबाईल शौचालय, अग्निशमन, आरोग्य, दहा उंच टॉवर लाईट, ४८ सीसीटीव्ही कॅमेरे, सात मेटल डिटेक्टर आदींची सोय करण्याकडे मंदिर संस्थानने पुरेपूर लक्ष दिले आहे. (वार्ताहर)
कोराडी नवरात्र तयारीचा आढावा
By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST