चार लाखांनी घातला गंडा : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई अमरावती : एका सेवानिवृत्त न्यायधीशाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथून अटक केली. मेहबूब खान नूर खान पठाण (४८, रा. निराला सोसायटी, ताजबाग, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.गजानन कॉलनीतील रहिवासी जगदीश हरीशचंद्र डोंगरे (६०) हे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांच्या घरी १३ मार्च २०१४ रोजी शेख शरीफ (रा. औरंगाबाद) व मेहबूब खान हे दोघे आले. आॅल फ्रेश प्रॉडक्ट कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर असल्याची बतावणी करुन त्यांनी डोंगरे यांना अमरावती, वाशिम व अकोला येथील कंपनीचे साठवणूकदार बनण्याचा सल्ला दिला. यामध्ये मोठा फायदा मिळणार असल्याची जाणीव त्यांनी करुन दिली. साठवणूक केलेल्या मालाची विक्री न झाल्यास कंपनी माल परत घेऊन पैसे परत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे डोंगरे यांनी कंपनीत चार लाख रुपयांची गुंतवणूक करुन माल खरेदी केला. हा माल त्यांनी नांदगावपेठ येथील एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. परंतु ज्या सेल्समन मार्फत डोंगरे यांनी माल खरेदी केला, तो कंपनी सोडून निघून गेला. त्यामुळे मालाची विक्री न झाल्याने डोंगरे यांनी कंपनीला माल परत केला. परंतु त्यांनी कंपनीला दिलेली रोख रक्कम परत मिळाली नाही. पैशाची मागणी केल्यानंतर कंपनीकडून त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येताच त्यांनी याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख शरीफ व मेहबूब खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूब खानला मंगळवारी नागपूर येथून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त न्यायाधीशाची फसवणूक आरोपीला नागपूर येथून अटक
By admin | Updated: July 23, 2014 00:50 IST