नागपूर : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लकडगंज भागातील गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय उद्या गुरुवारी जाहीर करणार आहे. या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.न्यायालयाने १४ जानेवारी रोजी निकालाची तारीख २८ जानेवारी निश्चित केली होती, परंतु उद्या निकालाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. राजेश धनालाल दवारे (२०) रा. वांजरी ले-आऊट कळमना, अरविंद अभिलाष सिंग (२४) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा सेंटर पॉर्इंट शाळेत चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे कामावरून काढलेला क्लिनिकचा नोकर राजेश दवारे आणि त्याचा मित्र अरविंद सिंग यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अपहरण केले होते. युग शाळेतून बसने घरी परतताच ही घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात त्याचा निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्युपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी मेयो इस्पितळात करण्यात आले होते.खंडणीसाठी दोन वेळा फोननागपूर : आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ‘युग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असे अपहरणकर्ता म्हणाला होता. हवेत स्वप्नांचे मनोरे चढवीत अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी युगचा भयावह अंत केला होता. लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. पहिल्याच दिवशी डॉ. मुकेश चांडक यांची पहिली साक्ष तपासण्यात आली होती. आतापर्यंत सरकार पक्षाने ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासले आहेत. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अॅड. मनोज दुल्लरवार, लिगल एडमार्फत मिळालेले आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. राजेश्री वासनिक, दुसरा आरोपी अरविंद सिंग याच्या वतीने अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
युग चांडक खून खटल्याचा निकाल आज
By admin | Updated: January 28, 2016 03:03 IST