विधानभवनावर धडकणार : जाहीरनाम्यात उल्लेख करूनही निर्णय नाहीनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर धनगर यांना एसटी प्रवर्गात आरक्षण निश्चित केले. परंतु महाराष्ट्रात धनगरऐवजी धनगड असे लिहिल्यामुळे समाज आरक्षणापासून वंचित आहेत. भाजप सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात उल्लेख करूनही आरक्षण न मिळाल्यामुळे आगामी ८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून धनगर समाज संघर्ष विकास समितीतर्फे भव्य धनगर आरक्षण अंमलबजावणी निश्चय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.धनगर समाजाला धनगड असा नावाचा फरक झाल्यामुळे आरक्षणापासून सातत्याने वंचित ठेवण्यात आले. या विरोधात १९ डिसेंबर २०१३ रोजी धनगर समाज संघर्ष समितीने विधानसभेवर अडीच लाख समाजबांधवांचा भव्य मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षणाबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजपचे शासन सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जाहीरनाम्यात उल्लेख करून तसेच धनगर समाज संघर्ष समितीला लेखी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे अधिवेशनात पिवळा भंडारा लावून समाजबांधव आरक्षणाची मागणी रेटून धरणार आहेत. शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास मोर्चा जागीच ठाण मांडून बसणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आरक्षण न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)लाखो समाजबांधव सहभागी होणारधनगर आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो समाजबांधव निश्चय मोर्चा काढणार असल्याची माहिती धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात धनगर समाजाचे १.२३ कोटी मतदार असून त्यांनी भाजपला मतदान केल्यामुळे भाजपचे शासन सत्तेत आले. परंतु समाजाला आरक्षण न मिळाल्यास कठोर निर्णय घेण्याची पाळी आली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीचे मधुकर पिचड हे धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, यासाठी मोर्चा काढणार असल्यामुळे समाजाचा मोर्चा ११ डिसेंबरपर्यंत मागे घेणार नसल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला देवेंद्र उगे, महादेव पातोंड, अरुण माहुरे, मोरेश्वर झिले, उत्तम चिव्हाणे, छाया कुरडकर, हरीश खुजे, अशोक खाडे, मधुकर अवझे, विलास डाखोळे उपस्थित होते.
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी निश्चय मोर्चा
By admin | Updated: November 29, 2015 03:32 IST