नागपूर : एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. तिजोरी रिकामी असल्याची ओरड सत्तापक्षातील पदाधिकारी करीत आहेत. निधी नसल्यामुळे प्रभागातील विकास कामे रखडल्याची ओरड नगरसेवक करीत आहेत. असे असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी चालविली आहे. तिजोरीत ‘अर्थ’ (पैसा) नाही तरीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाचे संकल्प सत्ताधारी करणार आहेत. १ जुलै रोजी महापालिकेच्या सभेत बोरकर हे अर्थसंकल्प सादर करतील. एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत. हे लक्षात घेऊन तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी मांडलेल्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाला आयुक्त श्याम वर्धने यांनी सुधारित अर्थसंकल्पात कात्री लावली होती. आयुक्तांनी २०१४-१५ चा अर्थसंकल्प सादर करताना, आपण मांडत असलेला १ हजार ६१ कोटींचा अर्थसंकल्प ‘रिअॅलिस्टिक’ असल्याचे आवर्जून सांगितले होते.
तिजोरीत नाही ‘अर्थ’ निवडणुकीसाठी ‘संकल्प’!
By admin | Updated: June 28, 2014 02:35 IST