मेडिकल : बीपीएल रुग्णांनाही द्यावे लागते शुल्कनागपूर : दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रुग्णांना मेंदूसह शरीराच्या इतर कोणत्याही भागाचे ‘एमआरआय’ मशीनवर निदान करायचे असल्यास दोन हजार रुपयांच्यावर पैसे मोजावे लागत असल्याने, या यंत्रावरील निदानाला गरीब रुग्ण मुकत आहेत. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकल रुग्णालयातील हे विदारक चित्र आहे.मेडिकलमध्ये दिवसाकाठी सुमारे १८०० च्यावर रुग्ण येतात. यातील सुमारे २०० हून अधिक गंभीर स्वरूपाचे असतात. यातील २५ टक्के रुग्णांना एमआरआय करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. एमआरआयसाठी १८०० ते २५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यापूर्वी विशिष्ट पेशीची नेमकी अवस्था जाणून घेण्यासाठी ‘डाय’ द्यावे लागते. मेडिकलमध्ये तेही उपलब्ध नाही. हा सर्व खर्च तीन ते चार हजाराच्या घरात जातो. एमआरआयच्या शुल्कातून बीपीएल आणि ज्येष्ठ नागरिकांना वगळण्यात आले नाही. यामुळे यातील बहुसंख्य रुग्ण एमआरआय न काढताच उपचार करण्याची विनंती करतात. मेडिकलमध्ये दिवसाकाठी शेकडो रुग्ण येतात. यातील बऱ्याच रुग्णांना एमआरआय करण्याची गरज असूनदेखील दिवसभरात दहाहून अधिक एमआरआय होत नाही. पैसे नसल्यामुळे मेडिकलमध्येही एमआरआय न काढणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. बीपीएल व अत्यंत गरजू रुग्णांना अधिष्ठात्यांच्या मदतीने एमआरआय मोफत काढावा, असे निर्देश तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मेडिकल आढावा बैठकीत अधिष्ठात्यांना दिले होते, मात्र आतापर्यंत अधिष्ठात्यांकडून एकाही गरजू रुग्णाचा एमआरआय झालेला नाही. वैद्यकीय अधीक्षक यांनी तर आपल्या कक्षाच्या भिंतीवरच एमआरआय मोफत नसल्याच्या सूचना लिहिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)
एमआरआयपासून गरीब रुग्ण दूर
By admin | Updated: December 18, 2015 03:24 IST