नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी महालातील एका मोठ्या धार्मिक स्थळासह परिसरातील विविध अतिक्रमण काढले. तर शहरातील ७ झोनमध्ये अतिक्रमण कारवाई करून ४०० अतिक्रमण काढून ८ ट्रक सामान जप्त करण्यात आले. दरम्यान, अतिक्रमणधारकांकडून ३८,५०० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.
अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांच्या मते गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या महाल परिसरात एक मोठे धार्मिक स्थळ तोडण्याची कारवाई करण्यात आली. या धार्मिक स्थळाची उंची ३५ फूट असल्याने टीटीएल मशीन व जेसीबीची मदत घेण्यात आली. त्यानंतर केळीबाग रोडवरील फुटपाथवरून ५४ अतिक्रमण काढून ९ ठेले जप्त करण्यात आले. काही अतिक्रमणधारकांकडून १९ हजार दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत फरस चौक ते झिंगाबाई टाकळी, अवस्थीनगर चौक ते शारदा चौक दरम्यान ६८ अतिक्रमण काढण्यात आले. येथेही अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यात आले. लकडगंज झोनच्या कळमना दहन घाटापासून कामठी रोड नाका नंबर ४ पर्यंतच्या फुटपाथवरील ५२ अतिक्रमण काढण्यात आले. या दरम्यान १५ अतिक्रमणधारकांकडून १५ हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. हनुमाननगर झोन अंतर्गत तुकडोजी पुतळा चौक ते बेसा रोड, मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक व क्रीडा चौकातील ६७ अतिक्रमण काढण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत व्हेरायटी चौक ते अभ्यंकरनगर चौक व सीताबर्डीच्या मोदी नंबर १,२,३ गल्लीतील ५६ अतिक्रमण काढण्यात आले. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत काँग्रेसनगरात देव नारायण पांडे यांच्या इमारतीचा अवैध भाग तोडण्यात आला. त्यानंतर बजाजनगर चौक ते काचीपुरा चौक व दीक्षाभूमी चौक दरम्यान ५५ अतिक्रमण काढण्यात आले.