- एका इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये : ब्लॅक मार्केटमध्ये दर तासाला वाढताहेत दर
- तुटवड्यामुळे संक्रमित रुग्णांच्या नातेवाइकांची दारोदार भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणात संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीरने टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना उत्तम संधी उपलब्ध करवून दिल्याचे स्पष्ट होत आहे. या इंजेक्शनचा शहरात प्रचंड तुटवडा आहे. याच संधीचा लाभ घेत, विविध औषध कंपन्यांचे जे इंजेक्शन ५७७ ते ५४०० रुपयांपर्यंत उपलब्ध व्हायला हवे, ते मागच्या दारातून २५ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. ‘मरता क्या, न करता’ अशा स्थितीमुळे नातेवाईकही रेमडेसिवीरसाठी वाट्टेल ती किंमत मोजत असल्याचे शनिवारी दिसून येत होते.
कोरोना संक्रमणाचा वाढता वेग आणि रेमडेसिवीरची गरज व निर्माण होत असलेला तुटवडा, त्यायोगे सुरू झालेला काळाबाजार बघता शासनाने या औषधाची विक्री किरकोळ बाजारात करण्यास बंदी घातली आहे. केवळ शासकीय रुग्णालयांमध्येच हे इंजेक्शन उपलब्ध होत आहे तर निश्चित औषधालयांनाच रेमडेसिवीरची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय शासनाने किंमतही निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने नागपुरात सीताबर्डी येथील जय बाबा मेडिकल, डागा हॉस्पिटलसमोरील सुरेश मेडिकल व आनंद मेडिकल आणि मेयो हॉस्पिटलसमोरील श्याम मेडिकल अशा चार ठिकाणी रेमडेसिवीरची शासकीय दरात विक्री केली जात आहे. मात्र, संक्रमितांचा वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एका अर्थाने स्थिती आवाक्याबाहेर गेल्याने आणि मागणी प्रचंड वाढल्याने संधीसाधू विक्रेत्यांनी रेमडेसिवीरची साठेबाजी करण्यास सुरुवात केली असून, मागच्या दाराने अर्थात काळ्याबाजारात ही किंमत २५ हजार रुपयांपर्यंत गेली आहे. विशेष म्हणजे, दर तासाला किमतीत दुपटीने वाढ केली जात असल्याचे दिसून येते.
शासकीय रुग्णालयांत संक्रमित रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नाहीत. खाजगी हॉस्पिटल्सही संक्रमित रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. सिटीस्कॅन रिपोर्टचा स्कोअर दहाच्या वर असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टर्स रेमडेसिवीर लिहून देत आहेत. नेमलेल्या औषधालयांतही रेमडेसिवीर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक ओळखी-अनोळखी व्यक्तींना फोनाफाेनी करून गळ घालत आहेत. या स्थितीचा लाभ संधीसाधू साठेबाजांनी घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी काळ्याबाजारात जे रेमडेसिवीर ५ ते १० हजार रुपयांत उपलब्ध होत होते. तेच शनिवारी रात्रीपर्यंत २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करवून दिले जात होते. अशा तऱ्हेने टाळूवरचे लोणी खाणारे संधीचा लाभ घेत रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे चित्र आहे.
----------------
साठेबाजीवर कुणाचेच नियंत्रण नाही
शासनाने रेमडेसिवीरच्या विक्रीवर व किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बंध लादले आहेत. मात्र, त्याअनुषंगाने होत असलेल्या साठेबाजीकडे सारासार दुर्लक्ष केल्याचे वर्तमान स्थितीवरून स्पष्ट होत आहे. सरकारी रुग्णालयांनाच उपलब्ध करून देण्याचा व नेमून दिलेल्या औषधालयांनाच विक्री करण्याची परवानगी दिली असताना, रेमडेसिवीर साठेबाजांपर्यंत कसे पोहोचत आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, लागेल तेवढे रेमडेसिवीर देण्याचा शब्दही हे साठेबाजार रुग्णांच्या नातेवाइकांना देत आहेत.
----------------
बाहेरील जिल्ह्यापर्यंत नागपुरातून काळाबाजार
कोरोना संक्रमणाचा वेग आता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत वाढला आहे. या जिल्ह्यांतही कोविड रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली असून, खाजगी हॉस्पिटल्सनाही रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रेमडेसिवीरसाठी रुग्णांचे नातेवाईक नागपूरपर्यंत पोहोचत आहेत. नाईलाजानेच म्हणा त्यांना काळ्याबाजारातूनच रेमडेसिवीर खरेदी करावे लागत आहे.
---------------
नातेवाईकांना बोलावले जाते दूरवर
रेमडेसिवीरसाठी काळ्याबाजारातील विक्रेते रुग्णांच्या नातेवाइकांना निश्चित स्थळी बोलावतात. प्रत्येक फोन कॉलनंतर ते स्थळ बदलत असतात. नातेवाईक म्हणतील त्या ठिकाणी ते येण्यास नकार देतात. फोनवरच रुग्ण कोण, तुम्ही काय करता, कुठे राहता, तुमचा व्यवसाय काय, एकटे आहात की दोघेजण असे प्रश्न विचारतात. रेमडेसिवीरची डिलिव्हरी करताना आधी एक व्यक्ती टेहळणी करतो. तो तुमच्या अवतीभवती फिरतो आणि नंतर प्रत्यक्ष व्यवहार करणारा व्यक्ती तुमच्याजवळ येऊन व्यवहार करतो. ऑनलाइन रक्कम घेण्यास नकार दिला जातो. रोख रकमेतच व्यवहार होईल, असे स्पष्ट केले जाते.
-------------
नेमलेल्या औषधालयांपुढे रांगाच रांगा
शासनाने नेमलेल्या औषधालयांपुढे रेमडेसिवीरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तुटवड्यामुळे प्रत्येक रुग्णाला एकच इंजेक्शनचा डोस दिला जात आहे. रात्री १० वाजता नंबर लावलेल्या नागरिकाला मध्यरात्री १ ते दीड वाजेपर्यंत वाट बघावी लागत असल्याचे चित्र आहे.
................