नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. बिछान्यावरील रुग्ण उठून उभा होईल या आशेवर रुग्णाच्या नातेवाइकांना वॉर्डासमोरील व्हरांड्यात रात्र काढावी लागत आहे. रुग्णालयाला २६ वर्षे होत आहे; मात्र प्रतीक्षालयासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याचे वास्तव आहे.
विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगाणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये रुग्ण येतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांच्या संख्येत १० हजारांनी वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. परंतु प्रतीक्षालय नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना अडचणीचे जात आहे. सहा वर्षांपूर्वी प्रतीक्षालयाचा प्रस्ताव समोर आला. या बांधकामासाठी एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला; परंतु खासगी संस्थेकडून शासकीय परिसरात बांधकाम होणार असल्याने मान्यतेला वर्ष लागले. अनेक अटी व त्याच्या पूर्ततेनंतर २०१६ रोजी मान्यता मिळाली. ४० बाय ५० चौरस फुटांच्या प्रतीक्षालयात महिला आणि पुरुषांसाठी असे स्वतंत्र दोन कक्ष उभे राहणार होते. या प्रतीक्षालयामुळे दूरवरून नागपुरात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना किमान उपचारादरम्यान डोके झाकायला निवारा मिळणार होता. परंतु जागेला घेऊन खासगी संस्थेमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर येथील रुग्णांच्या नातेवाइकांच्या प्रतीक्षालयासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. परिणामी, नातेवाइकांना वॉर्डासमोरील वऱ्हांड्यात ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही दिवस काढावे लागत आहे.