नागपूर : मेयो, मेडिकलच नाही तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवेसाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. मात्र यातील बहुसंख्य कर्मचारी वरिष्ठ डॉक्टरांच्या सेवेत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्यापासून ते विविध चाचण्यांसाठी रुग्णाची ने-आण करण्याची कामे करण्याची वेळ आली आहे.
मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये विदर्भासह छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश येथून रुग्ण येतात. रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्णहिताच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने सफाईचे व रुग्णसेवेतील अटेन्डंटच्या कामाचे ‘आऊटसोर्सिंग’ केले आहे. यावर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. परंतु हवा तसा फायदा रुग्णसेवेत होत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: अटेन्डंटची कामे रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. कंत्राटी कर्मचारी शोभेचे बाहुले ठरले आहेत.
-स्ट्रेचर व अटेन्डंट मिळणे कठीण
संजय पाटील या रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, मेडिकलमध्ये स्ट्रेचर व अटेन्डंट एकाच वेळी मिळणे कठीण आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होते. बुधवारी रात्री गर्भवती बहिणीला घेऊन मेडिकलमध्ये आलो, परंतु स्ट्रेचरसाठी धावाधाव करावी लागली. कसेतरी स्ट्रेचर मिळाले तर अटेन्डंटचा पत्ता नव्हता.
-स्ट्रेचरसाठी आधार कार्ड जमा करावे लागते
राजू देशमुख या रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, मेडिकलमध्ये भरती असलेल्या भावाला अँजिओग्राफीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविले. रुग्णवाहिकेने येथे आल्यावर प्रवेशद्वाराजवळ स्ट्रेचर नव्हते. विचारपूस केल्यावर आधार कार्ड जमा करून स्ट्रेचर मिळत असल्याची माहिती दिली. जवळ आधार कार्ड नव्हते यामुळे लायसन्स ठेवून स्ट्रेचर मिळविले.
-अटेन्डंटने केवळ मार्ग दाखविला
अजय सिंग या रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, पॅरालिसीस झालेल्या वडिलांना मेयोमध्ये आणल्यावर स्ट्रेचरसाठी बराच वेळ वाट पहावी लागली. स्ट्रेचर मिळाल्यानंतर तेथील अटेन्डंटने स्ट्रेचर मागून ढकलण्याचे सांगून केवळ मार्ग दाखविण्याचे काम केले.