आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : मार्च २०२० पासून आजवर कळमेश्वर तालुक्यातील २,४०५ जणांना काेराेनाने गाठले. यातील अनेकांनी काेराेनावर समर्थपणे मात केली तर, दुर्दैवाने ४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्यंतरी तालुक्यातील काेराेना संक्रमण शून्यावर आले हाेते. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील संक्रमणाला सुरुवात झाली असून, राेज १५ ते २० नवीन रुग्णांची भर पडत आहे.
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात कळमेश्वर तालुक्यात एकूण २१५ काेराना रुग्णांची नाेंद करण्यात आली. रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, नागरिक आणि प्रशासन काेराेनाबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. विना मास्क फिरणे, बँक शाखा, दुकाने व बाजारात गर्दी करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह नागरिकांना अन्य हलगर्जीपणा काेरोनाच्या पथ्यावर पडत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली.
शासनाने सक्ती केली असली तरी शहरातील काही दुकानदारांसह ग्राहक तसेच काही कर्मचारी मास्क वापरत नसल्याचे दिसून येते. या बँक शाखा व रजिस्ट्रार कार्यालय अग्रणी आहे. शिवाय, लग्नसमारंभांचे धुमधडाक्यात आयाेजन केले जात असून, उपाययाेजनांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे. लसीकरण मोहीम सुरू असून, ज्येष्ठ नागरिकांनी व ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींनी लस घ्यावी. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. तसेच सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळून आल्यास काेराेना टेस्ट करवून घ्यावी. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनीही टेस्ट करावी, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले आहे.
....
३,१५४ नागरिकांचे लसीकरण
मार्च २० ते मार्च २१ या काळात कळमेश्वर-ब्राह्मणी परिसरातील १२,२१० व ग्रामीण भागातील १३,९५२ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यातच १ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या ११ दिवसांमध्ये कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात १,८४९ तर तालुक्यातील गोंडखैरी, मोहपा, धापेवाडा व तिष्टी या चार प्राथमिक आराेग्य केंद्रात १,३०५ नागरिकांनी स्वत:हून नाेंदणी करवून घेत लसीकरण करून घेतले. ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील आजारी व्यक्तींनी ॲपवर नोंदणी करावी तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी आधार कार्ड घेऊन रुग्णालयात यावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
...
अन्यथा दंडात्मक कारवाई
शहरातील सर्व फेरीवाले, दुकानदार, सलून व हाॅटेल व्यावसायिक, भाजीपाला व फळ विक्रेत्यांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी कोरोना टेस्ट करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा. बाजार व दुकानात गर्दी करू नये, अन्यथा नियमानुसार दंड कारवाई करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प लावण्यात आला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींनी लस घ्यावी. शिवाय, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.