नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहक सरोजिनी रोडगे यांना मौजा शिरुर, ता. हिंगणा येथील ले-आऊटमधील भूखंडाचे कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून द्या असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चिराग बिल्डर्स ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सला दिला. हे प्रकरण आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढले.
यापूर्वी आयोगाने ६ जुलै २०१३ राेजी रोडगे यांची तक्रार अंशत: मंजूर करून संबंधित भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आणि रोडगे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रार खर्चापोटी ३ हजार रुपये भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते. तसेच पुढे, चिराग बिल्डर्सने या निर्णयाविरुद्ध राज्य आयोगाकडे दाखल केलेले अपील ६ जुलै २०१७ रोजी फेटाळण्यात आले. त्यानंतरही जिल्हा आयोगाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे रोडगे यांनी पुन्हा जिल्हा आयोगात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत चिराग बिल्डरने ले-आऊटला मंजुरी मिळवून रोडगे यांना भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही दिली. तसेच, रोडगे यांनी त्याकरिता प्रतीक्षा करण्याची तयारी दर्शवली. परिणामी, आयोगाने सदर आदेश देऊन अर्ज निकाली काढला.