लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : काेराेना संकट काळात नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबलू गाैतम यांनी केले. काेराेना संक्रमित रुग्णांनी काेणतीही माहिती न लपवता, स्वत:सह परिसरातील नागरिकांचा जीव धाेक्यात घालू नका, असेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदी व संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुटीबाेरी नगर परिषदेत गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या ‘ब्रेक द चेन’अंतर्गत चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शुक्रवार(दि.१६)पासून बुटीबाेरी नगर परिषदेंतर्गत सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्ण व नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून औषधी दुकाने शासनाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. तसेच दुपारी २ वाजेनंतर जी दुकाने सुरू राहतील, त्यांच्यावर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल. साेबतच विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये आणि विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसाकरिता सील केले जाईल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला नगराध्यक्ष बबलू गाैतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सभापती मुन्ना जयस्वाल, विनाेद लाेहकरे, मंदार वानखेडे, अनिस बावला, गटनेता आकाश वानखेडे, नगरसेवक प्रवीण शर्मा, बबलू सरफराज, मनाेज ढाेके, सनी चव्हाण यांच्यासह राजू गावंडे, प्रदीप चंदेल, दामू गुजर, मंगेश आंबटकर, बल्लू श्रीवास, अमजद शेख, सुनील किटे, सुभाष राऊत, सहायक पाेलीस निरीक्षक सतीश सोनटक्के, हवालदार विनायक सातव, न.प. अग्निशमन अधिकारी समीर गणवीर तसेच सर्वपक्षीय नेते व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.