विजय दर्डा यांचे आवाहन : ‘ऋतुरंग’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटननागपूर वॉटर कलर सोसायटीच्यावतीने लोकमत भवनाच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘ऋतुरंग’ या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे प्रकाश एदलाबादकर, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर, प्रा. सुभाष बाभूळकर, ज्येष्ठ चित्रकार डॉ. विजय काकडे आदी उपस्थित होते.दर्डा म्हणाले, बंगालमधील कलावंतांना राजाश्रय आहे, मात्र महाराष्ट्रात असा राजाश्रय दिसून येत नाही. जागतिक दर्जाच्या कलादालनाची शहराला आवश्यकता आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या दालनामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रांमधून शहराची ओळख निर्माण होते, तेथील संस्कृती कळते. नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची आवश्यकता आहे.एदलाबादकर म्हणाले, कलेची साधना एकांतात नाही तर लोकांतात व्हावी, तरच स्वत:चा विकास होतो. कलावंतांनी मनाच्या मंथनातून कला सादर करावी, असेही ते म्हणाले. डॉ. काकडे म्हणाले, वॉटर कलर असे माध्यम आहे जे लोकांना जवळ आणते, म्हणूनच जगात सर्वात जास्त वॉटर कलर सोसायट्या आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार दिलीप भालेराव व डॉ. विजय काकडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय बिसवाल यांनी केले. संचालन सदानंद चौधरी यांनी तर आभार विजय अनसिंगकर यांनी मानले.प्रदर्शनात नागपूर वॉटर कलर सोसायटीच्या एकूण १२ कलाकारांनी भाग घेतला. यात विजय काकडे, विजय अनसिंगकर, अजय रायबोले, जयंत आष्टनकर, प्रफुल्ल तायवाडे, दिलीप भालेराव, विजय बिसवाल, श्याम डोंगरवार, नितीन पाटील, हेमंत मोहोड, गिरीश टोळ व सुनील पुराणिक आदींचा समावेश आहे. नागपूर आणि आजूबाजूच्या ठिकाणांना या कलाकारांनी जलरंगात कैद करून प्रदर्शित केले आहे. हे प्रदर्शन २३ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत सर्वांसाठी खुले राहील. कार्यक्रमाला वीणा मॅथ्यूस, शिबू मॅथ्यूस, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता अरुण भापकर यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. (प्रतिनिधी)