दीपरंग नाट्य महोत्सव : आनंदी नाट्य संस्थेचे सादरीकरण नागपूर : मानवी जीवनातील दैनंदिन खाचखळग्यांच्या, सुखदु:खांच्या प्रवासाचे प्रातिनिधिक स्वरूप असलेल्या रेल्वे प्रवासातील यात्रेकरूंच्या भावभावनांच्या परस्पर अनुबंधाचे ‘चलती का नाम गाडी’ हे नाटक आज दीपरंग महोत्सवात सादर करण्यात आले. वास्तववादी अनुभूतीचे, सकस लेखनाचे ‘चलती का नाम गाडी’ या नाटकाच्या प्रयोगाने आज रसिकांना जिंकले. मानवी जीवनातील सुखदु:खांचे वास्तव या नाटकात प्रशंसनीय पद्धतीने सादर करण्यात आले. लेखिका अरुणा भिडे आणि सारंग मास्टे दिग्दर्शित या नाटकाने रसिकांचे लक्ष वेधले. सर्वसाधारणपणे सारखाच वाटणारा फ्लॅटफॉर्म, रेल्वेगाड्यांची वर्दळ व सातत्याने प्रवास करणारे प्रवासी, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या सुखदु:खाचे हे नाट्य होते. मुंबईत स्वत:चे नाव कमविण्यासाठी येणारे तीन तरुण. त्यातला एक शायर, दुसरा अभिनेता आणि तिसरा संगीतकार. आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहाचे स्वप्न घेऊन मुंबईला निघालेल्या मायलेकी आणि आपले घरदार विकून भावी आश्वासक जीवनापेक्षेने मुलाकडे कायम राहण्यासाठी निघालेले मायबाप अशा पात्रांभोवती हे नाट्य गुंफले आहे. अनोळखी व्यक्तींच्या संवादातून प्रत्येकाच्याच वेदना जवळपास सारख्याच असतात, याची मांडणी करणारे हे नाट्य रसिकांना रिलेट करीत गुंतवणारे होते. कलात्मक मांडणीने हा प्रयोग उपस्थितांची दाद घेणारा ठरला. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहताना इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मदत करावी, असा संदेश या प्रयोगातून देण्यात आला. लेखिकेचे सहज, सोपे ओघवते संवाद, कुशल दिग्दर्शन आणि सर्वच कलावंतांनी समरसून केलेले सादरीकरण यामुळे हा प्रयोग रसिकांची दाद घेणारा ठरला. नेपथ्य हा नाटकाच्या सुखद अनुभूतीचा भाग असतो. याची प्रचिती संजय काशीकर यांच्या नेपथ्यातून आली. यात देवदत्त केळकर, अभिजित खेर, बालकलावंत आर्यन दाभोळकर, विजय मोडक, नीता खोत, कल्याणी गोखले, ओंकार लपालकर, सागर पंडित, सतीश ठेंगडी यांनी भूमिका केल्या. प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे यांची आणि संगीत अभय पांडे यांचे होते. रंगभूषा चेतना केळकर यांनी केली. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या ट्रॅव्हलकिंगचे व्यवस्थापक माधुरी व जिंतेंद्र नाकाडे, डॉ. नीलकांत कुलसंगे, अरुणा भिडे, संगीत समीक्षक मधुरिका गडकरी, मंजूषा जोशी यांचे स्वागत आयोजकांतर्फे श्रद्धा तेलंग व प्रभा देऊस्कर यांनी केले.
वास्तववादी अनुभूतीचे ‘चलती का नाम गाडी’
By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST