अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
- गर्भवती असल्याचा खुलासा, पीडिता करत होती दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमसंबंधात अल्पवयीन विद्यार्थिनीचे यौनशोषण झाले. विद्यार्थिनी गर्भवती झाल्याने प्रकरण पुढे आले. पीडितेकडून दिशाभूल केली जात असल्याने पोलिसांना प्रकरणाचा छडा लावण्यात समस्या उत्पन्न होत होती.
१६ वर्षीय पीडित विद्यार्थिनीची एका तरुणासोबत मैत्री आहे. तरुणाने विवाहाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विद्यार्थिनीने याबाबत कुटुंबीयांकडे कधीच वाच्यता केली नाही. दरम्यान, विद्यार्थिनीला दिवस राहिले. तिची वागणूक शंकास्पद दिसल्याने कुटुंबीयांनी तिला १९ मार्च रोजी डॉक्टरांकडे नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थिनीचा गर्भपातही झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी हॉस्पिटलने मानकापूर पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी विद्यार्थिनी व तिच्या आईची चौकशी केली. विद्यार्थिनीने वेगवेगळ्या मार्गाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी ती पायी जात असताना, मानकापूर परिसरात नाल्याजवळ एका बाईकस्वाराने तिला रोखले. जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्या युवकाने तिच्यासोबत बलात्कार केल्याचे तिने सांगितले. घाबरल्यामुळे या घटनेबद्दल कुणालाच सांगितले नसल्याचे ती सांगत होती. तिच्या आईनेसुद्धा अधिक माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांना विद्यार्थिनीच्या वक्तव्यावर शंका उपस्थित झाली. पोलिसांनी बलात्कार व पोक्सो अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आणि मोबाईलचा तपास सुरू केला. यातून तीन ते चार युवकांवर शंका उत्पन्न झाली. पोलिसांनी सर्वांनाच ठाण्यात आणले. त्यानंतर एका युवकासोबत तिचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
...............