भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा : अजनी पोलिसांकडे प्रकरण नागपूर : शाळा बंद करण्याची धमकी देऊन एका मुख्याध्यापकाला सात लाखांची खंडणी मागणाऱ्या भीमसेना विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये स्वाभिमानी सामाजिक संघटना तसेच भीमसेना विद्यार्थी सेनेचा नागपूर जिल्हा अध्यक्ष अमित हाडके, उपाध्यक्ष दिलीप मंडले आणि अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्वकर्मानगर येथे श्री निकेतन प्राथमिक विद्यालय आहे. हरिराम श्यामराव कढाणे हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या केबिनमध्ये शाळेच्या इतर शिक्षकांसोबत चर्चा करीत असताना हे सर्व आरोपी केबिनमध्ये घुसले. त्यांनी मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली. ‘तुम्ही शाळेचे शासकीय तांदूळ ब्लॅकमार्केटमध्ये विकत आहात, अशा तक्रारी आमच्या भीमसेना विद्यार्थी सेना संघटनेकडे आल्या आहेत. आम्ही तुमची शाळा बंद करून टाकू’, अशी धमकी त्यांनी दिली. मुख्याध्यापकांनी कुणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांना प्रतिबंध केला. प्रकरण मिटवायचे असल्यास प्रथम पाच लाख रुपये आणि नंतर दोन लाख रुपये द्यावे लागेल, असे ते म्हणाले. मुख्याध्यापकांनी ही अवाढव्य खंडणी देण्यास नकार दिला असता त्यांनी स्वत:हूनच सौदेबाजी केली. त्यांनी २० हजाराची खंडणी उकळली. आमचे कार्यकर्ते शाळेत आल्यास त्यांनाही १० हजार रुपये देऊन टाकाल, असेही ते म्हणाले होते. या खंडणीबाजांनी या प्रकरणाची वाच्यता केल्यास किंवा पोलिसात तक्रार केल्यास पाहून घेण्याची धमकीही दिली होती. अजनी पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून या खंडणीबाजांविरुद्ध भादंविच्या ३८४, ३४१, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकाला मागितली सात लाखांची खंडणी
By admin | Updated: November 11, 2015 02:31 IST