लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगमंच, नाट्यगृहांची उणीव अशा रंगकर्मींच्या अनन्य मागण्यांचा जोर असताना निसर्गाच्या कुशीतही रंगमंच उभारला जाऊ शकतो, ही संकल्पना नागपुरात रूढ होण्याचा विचार मार्गस्थ झाला आहे. ‘थिएटर विथ नेचर’ ही संकल्पना वास्तवात साकारली गेली आहे. अशाच वातावरणात रविवारी एका हिंदी नाटकाचे सादरीकरण झाले.
रामदासपेठेतील नागनदी काठी राष्ट्रभाषा परिवारने साकारलेल्या ‘थिएटर विथ नेचर’ या प्रांगणात हा नाट्यप्रयोग पार पडला आणि त्याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. राष्ट्रभाषा परिवाराच्या वतीने टाळेबंदीच्या दीर्घकाळानंतर नाट्यकार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याच कार्यशाळेतून हे नाटक सादर झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी चंदन कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या राकेश मोहन यांच्या ‘सबसे बडा सवाल’ या नाटकाचे सादरीकरण कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींनी केले. राजकीय दृष्टिकोन, संसद आणि सभांमधील संभाषणांवर एक व्यंगात्मक प्रहार असलेले हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या गारठ्यात या नाटकाचा आनंद रसिकांनी घेतला. यावेळी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल व कार्यशाळेच्या समन्वयिका मंगल सानप, नाट्यविभाग प्रमुख रूपेश पवार उपस्थित होते.
.........