नागपूर : दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्मारकाला राजघाटप्रमाणे दर्जा मिळावा, अशी मागणी डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सम्मान-कार्यक्रम समितीने केला आहे. या मागणीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेत उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री संघप्रिय गौतम यांनी या मागणीची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीच्या २६ अलीपूर रोड येथे असलेल्या याच निवासस्थानात डॉ. बाबासाहेबांचे निर्वाण झाले होते. समितीच्या आंदोलनानंतर २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने बाबासाहेबांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक घोषित केले होते. सरकार बदलल्यानंतर या स्मारकाला राजघाटचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब हे मानव अधिकाराचा पुरस्कार करणारे देशाचे महान पुत्र होते. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या राजकीय पाहुण्यांनी या स्मारकाचे दर्शन घ्यावे यासाठी कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी गौतम यांनी केली. परिनिर्वाण भूमीला व्यापक स्वरूप देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार आहे व पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने इंदू मिलची जागा व बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाचा तिढा सुटला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी ही मागणीही पूर्ण करतील, असा विश्वास संघप्रिय गौतम यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रपरिषदेला सेवक गजभिये, अलकाताई कांबळे, प्रमोद तभाने आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
दिल्लीतील आंबेडकर स्मारकाला मिळावा राजघाटचा दर्जा
By admin | Updated: November 18, 2015 03:18 IST