समाजकल्याण विभागात सामाजिक न्याय दिन साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानव जातीच्या कल्याणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान फार मोठे आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायावर आधारित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. त्यांनी त्या काळात अनेक अनिष्ट चालिरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनांशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविलीत. खऱ्या अर्थाने ते ‘सामाजिक न्यायाचे अग्रदूत’ होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथे केले.
समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गरजूंपर्यत पोहचणे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करुन लाभार्थ्यांना किती लाभ झाला, याचे विश्लेषण व्हावे, असे सांगितले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. संचालन स्नेहल शंभरकर यांनी तर जनसंपर्क अधिकारी जयश्री धवराळ यांनी आभार मानले.
बॉक्स
शाहू महाराज ‘आपत्ती व्यवस्थापन गुरू
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ‘आपत्ती व्यवस्थापन गुरू’ म्हणून ओळखल्या जाते. १२२ वर्षांपूर्वी देशात प्लेग व दुष्काळामुळे दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडले. अशा साथरोग आपत्तीच्या काळात शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील साथरोग नियंत्रणात राहिला. यावरुन महाराजांची दूरदृष्टी बघायला मिळते. सध्याच्या कोरोना-१९ काळात राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगीकारून या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केले.