राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद : कोळसे पाटील यांचे आवाहन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातच जनतेच्या सर्वांगीण विकासाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. परंतु संविधानाची अंमलबजावणी या देशात अद्यापही झाली नाही, ही शोकांतिका आहे. सध्या धर्मांध शक्तींद्वारे संविधानाला बाजूला सारून सामान्यजनांना तडफडून मारण्याचे कारस्थान देशात सुरू आहे. तेव्हा संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी देशव्यापी लढा उभारा, असे आवाहन माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. रिपब्लिकन विचार मंचतर्फे रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक एस. आर. दारापुरी अध्यक्षस्थानी होते. विचारवंत इरफान अली इंजिनीअर, बौद्ध साहित्यिक कंवल भारती प्रमुख अतिथी होते. बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त जिल्हा व्यवस्थापक एस.जी. बनसोड हे स्वागताध्यक्ष होते. ‘भारतातील वर्तमान राजकीय क्षेत्रात भारतीय संविधान, रिपब्लिकन संकल्पना, बहुसंख्यकवाद आणि सांप्रदायकिता’ या विषयावर बोलताना बी.जी. कोळसे पाटील यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की, संविधानाची सुरुवातच ‘आम्ही भारताचे लोक’ अशी करण्यात आली आहे. भारतीय संविधान आज जगभरात परिपूर्ण व सर्वश्रेष्ठ म्हणून मान्यताप्राप्त आहे, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. अन्न, वस्त्र, निवारा, औषध आणि शिक्षण हे नागरिकांचे मूलभूत अधिकार असून या गोष्टी नफा कमावण्याचे साधन नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. सध्या देशात जी सत्ता आली आहे, त्यामुळे वेगळाच धोका निर्माण झाला आहे. धर्मांध शक्ती मुजोर झाल्या आहेत. संविधानावर त्यांचा विश्वास नाही. मूठभर लोकांचा विकासाला ते संपूर्ण देशाचा विकास म्हणून प्रचार करीत आहे. भांडवलशाहीच्या ताब्यात केवळ सत्ताच नव्हे तर लोकशाहीचे चारही खांब आहेत. त्यामुळे अधिक धोका आहे. खोटे महापुरुष उभे केले जात आहेत. एस.जी. बनसोड यांनी स्वागतपर भाषण केले. रिपब्लिकन विचार मंचचे अध्यक्ष विजय ओरके यांनी प्रास्ताविक केले. एम.एन. रामटेके यांनी आभार मानले. धर्मनिरपेक्ष प्रजातांत्रिक राजकारणात रिपब्लिकन विचारधारा हाच एकमात्र विकल्प’ या विषयावर प्रा. एन.व्ही. ढोके यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र पार पडले. प्रसिद्ध विचारवंत प्रा. रणजित मेश्राम यांनी अभिभाषण केले. विचारवंत कंवल भारती, डॉ. नंदलाल भारती, अॅड. दिवाकर सिंह प्रमुख अतिथी होते. (प्रतिनिधी)
संविधान अंमलबजावणीसाठी लढा उभारा
By admin | Updated: September 22, 2014 00:56 IST