९४.९० टक्के पाऊस : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून सक्रियनागपूर : यंदा मान्सूनचा पाऊस हा थोड्या थोड्या अंतराने झाला. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस यावर्षी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने यावर्षीचा ‘बॅकलॉग’ जवळपास भरून काढला आहे. १ जून ते १० सप्टेंबरपर्यंत नागपुरात सरासरी ८२० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास ९४.९० टक्के पाऊस झाला आहे. नागपुरात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ९७५ मि.मी.पर्यंत पाऊस होतो. सप्टेंबर संपायला अजून २० दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत १९६.३ मि.मी. पाऊस झाला तर सामान्य स्तरापर्यंत पावसाची आकडेवारी पोहोचेल. नागपुरात ३० आॅगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस दडून बसला होता. सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली होती. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने परिस्थिती सांभाळून घेत, यावेळचा पावसाचा बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबरच्या पहिल्या १० दिवसाच्या पावसाने नागपूरची एकूणच परिस्थिती सुधारली असून पिकांनाही जीवदान दिले आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पाऊस चांगला झाला. १ जून ते ३० आॅगस्टपर्यंत नागपुरात ६८४.५ मि.मी. पाऊस झाला. १५ दिवस विलंबाने पोहोचलेला मान्सून जुलैच्या अंतिम आठवड्यात मेहेरबान झाला. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता होती. परंतु तसे झाले नाही. सप्टेंबरपासून मान्सून सक्रिय झाला. (प्रतिनिधी)आकडेवारीत तफावत हवामान विभागाने १० सप्टेंबरपर्यंत नागपूर शहरात ७७८.७ मि.मी. पाऊस झाल्याचा दावा केला आहे. तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रसिद्धीपत्रकात ८ सप्टेंबरपर्यंत ८४६ .१६ मि.मी. पावसाची नोंद दर्शविण्यात आली आहे. दोघेही आपापली आकडेवारी खरी असल्याचे सांगत आहेत. विभागातील परिस्थितीत सुधारणा मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूर विभागातील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. १ जून ते ८ सप्टेंबरदरम्यान नागपूरशिवाय वर्धा जिल्ह्यात ७८६.७८ मि.मी., भंडाऱ्यात १११२.६३ मि.मी., गोंदियात ११८४.८९ मि.मी., चंद्रपूर ९८४.३३ मि.मी., गडचिरोलीमध्ये ११९५.४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. विभागात १०१८.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, ही सरासरी पावसाच्या ८७ टक्के इतकी आहे. पाणीसाठ्यात वाढ नुकत्याच पडलेल्या पावसामुळे नागपूर विभागातील मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोहमध्ये १०४५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. नागपुरातील १३ मध्यम प्रकल्पांमध्ये १८३.६६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे.
पावसाने बॅकलॉग भरला
By admin | Updated: September 11, 2014 01:09 IST