लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी रॅकेटशी जुळलेल्या दोन बुकींना रंगेहात पकडले. त्यांचा एक साथीदार फरार झाला. गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राहुल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये ही कारवाई करण्यात आली. विशाल अरुण कालेश्वरे (३३) व चंदन सदाशिव राठोड (३१) रा. राहुल रेसिडेन्सी अपार्टमेंट गणेशपेठ आणि फरार अशफाक अन्सारी (३८) रा. मोमीनपुरा अशी आरोपीची नावे आहेत.
विशाल व चंदन राहुल रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०५ मध्ये क्रिकेट सट्टेबाजीचा अड्डा चालवीत होते. ते रविवारी पंजाब किंग आणि दिल्ली कॅपिटल यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यावर सट्टेबाजी करीत होते. पोलिसांना याची सूचना मिळताच पोलिसांनी रविवारी रात्री फ्लॅटवर धाड घातली. आरोपींना खायवाडी करताना पोलिसंनी रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून सात मोबाईल, टीव्हीसह ७७ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. अशफाक अन्सारीच्या इशाऱ्यावर ते सट्टेबाजी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अशफाकचा शोध घेत मोमीनपुऱ्यात धाड घातली. परंतु तो अगोदरच फरार झाला होता.
सूत्रानुसार अशफाक क्रिकेट सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटशी जुळला आहे. या दिशेने कसून तपास
केला गेला तर अनेक जण यात सापडू शकतील. आरोपीजवळ क्रिकेट बॅटिंगची मास्टर आयडी होती. खुशी ऑनलाईन बुक नावाने ही मास्टर आयडी चालविली जात होती. या आयडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी होत असल्याची माहिती आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय संदीपान पवार, एपीआय पवन मोरे, हवालदार प्रशांत लाडे, नायक शिपाई श्याम कडू, संदीप भावलकर, रोशनी तरारे आणि शेख फिरोज यांनी केली.