नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी गिट्टीखदानच्या भिवसनखोरी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूनिर्मितीच्या भ ट्ट्यांवर धाड घालून ६.२५ लाखाचा माल जप्त केला. अनेक महिन्यापासून या भट्ट्या सुरू असल्याने, स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी भट्टी चालविणाऱ्या दोन महिलांना अटक केली, मात्र दोघ्या जणी पसार झाल्या.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रीती रोशन खोब्रागडे व कविता प्रकाश टेंभुर्णे यांचा समावेश आहे. रंजना कुपरसिंग सोनटक्के व लंकाबाई पंजाबराव गजभिये, अशी फरार आरोपींची नवे आहेत. भिवसनखोरी परिसर नेहमीच अवैध दारूभट्टीसाठी चर्चेत राहतो. पोलीस कधी कधी धाड टाकून कारवाई करते. मात्र जामिनावर सुटका होताच पुन्हा भट्टी सुरू केली जाते. अधिकृत मद्य दुकाने बंद असले की या अवैध भट्टीची कमाई वाढते. यामधून शहरातच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातही निर्यात केली जाते. गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांनी या भट्ट्यावर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राजरोसपणे या भट्ट्या सुरू आहेत. याची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी पहाटे या भट्ट्यांवर कारवाई केली. भिवसनखोरीमध्ये बहुतेक महिला दारू विक्रीचे काम करतात. पोलिसांची कारवाई होताच त्या अभद्र व्यवहार करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ६० पोलिसांच्या टीमसह येथे कारवाई करण्याची योजना आखली. पहाटे दोन-दोनच्या चमूसह या झोपडपट्टीत प्रवेश केला. सर्व पोहोचल्यावर पोलिसांनी भट्ट्यांवर धाड घातली. येथे तीन मोठे भट्ट्या सुरू होत्या. एका भट्टीत मोठ्या चुलीवर दारू तयार केली जात होती. तर इतर दोन ठिकाणी प्लास्टिकच्या ड्रममध्ये दारू संग्रहित केली होती.
मोठ्या प्रमाणात पोलीस दल असल्याने येथील महिला पळायला लागल्या. महिला पोलिसांनी दोन आरोपी महिलांना पकडले. दोन आरोपीसह ६.२५ लाखाचा मालही जप्त केला. पोलिसांनी चारही भट्ट्या नष्ट केल्या. आरोपी महिला अनेक दिवसापासून दारूनिर्मिती करीत होत्या. त्यांना आधीही अटक करण्यात आली होती. गिट्टीखदान पोलिसात त्यांच्याविरोधात अवैध दारूनिर्मिती कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई डीसीपी गजानन रायमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पीआय किशोर पर्वते, पाटील, तलवारे, एपीआय सुमित परतेकी, मेश्राम, गणेश पवार, पीएसआय राजकुमार त्रिपाठी, लक्ष्मीछाया तांबुस्कर, पी.एम. मोहेकर, राजेश नाई, मयूर चौरसिया, थोरात, एएसआय राजेश लोही, हवालदार संतोष मदनकर, रवी साहू, सतीश पांडे, महेश कुरसंगे, राजेश तिवारी, रामनरेश यादव, सुनील कुंवर, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, श्याम गोरले, कमलेश गहलोद व प्रवीण जाधव यांनी केली.