माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदा-पावडदाैना मार्गावर सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्ड्यावर धाड टाकली. त्यात सट्टापट्टी स्वीकारणाऱ्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २९) दुपारी करण्यात आली.
रिंगू खन्ना, रा. जवाहरनगर, भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माैदा परिसरात गस्तीवर असताना त्यांना माैदा‘पावडदाैना मार्गावरील अंगणवाडी परिसरात सट्टापट्टी स्वीकारली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली. तिथे सट्टापट्टी स्वीकारली जात असल्याचे लक्षात येताच लगेच धाड टाकली. रिंगूला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ८ हजार रुपये राेख, माेबाईल, सट्टापट्टी लिहिण्याचे साधन असे एकूण १ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनाेद काळे, सत्यशील काेठारे, प्रणय बनाफर, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.