लोहारा येथील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशाराउमरेड : तालुक्यातील लोहारा येथे ट्रान्सफॉर्मरची समस्या काही महिन्यापासून ‘जैसे थे’ असल्यान रबी पीकही संकटात सापडले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली असून अद्याप वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावली नाही. लोहारा येथील मोहन म्हैसकर यांच्या शेतात लावण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर कुजलेल्या अवस्थेत आहे. सर्व्हिस वायरचे इन्शुलेशनही निघालेले आहे. या ट्रान्सफॉर्मरची ग्रीपही तुटलेली आहे. वेळोवेळी पंप बद पडत असल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ट्रान्सफॉर्मरवरून फेज टाकताना अथवा अन्य कामे करताना मोठा धोका होण्याचीही संभावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावात ज्या ट्रान्सफॉर्मरवरून वीज वितरित करण्यात येत असते त्यावरही अतिरिक्त भार आहे. यामुळे वारंवार वीज ट्रिप होण्याची समस्या नेहमीचीच झाली आहे. यामुळे गावात पाणी समस्याही निर्माण झाली आहे. पाणीपुरवठाच योग्यरीत्या होत नसल्याने गावकऱ्यांना नाईलाजाने पाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरची पायपीट करावी लागते.वाघाची दहशतशेतकऱ्यांना पाण्यासाठी फरफट सोसावी लागत असून परिसर जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाघाचीही दहशत आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागानेही सतर्कतेने कार्य पार पाडावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.साहित्य अपुरेपाच एकर ओलिताला महिना लागत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. तर दुसरीकडे ट्रान्सफॉर्मर वा अन्य कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाणवा आहे. साध्या ग्रीपसाठी चार चकरा माराव्या लागल्या. गावात केबल वायर १५ दिवसापासून पडून आहे. वायरसाठीही अनेकदा कार्यालयाचा उंबरठा झिजवावा लागला असल्याचीही कैफीयत शेतकऱ्यांनी मांडली. (प्रतिनिधी)आंदोलन करणारखरीप हंगामात सोयाबीन पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. कापूस थोड्याफार आशा पल्लवित करीत आहे. तर दुसरीकडे रबी पिकांच्या नियोजनाची युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. अशावेळी पाणी असूनही वीज अजबगजब धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वीज भारनियमनाशिवाय तासन्तास वीज बंद ठेवण्यात येत असल्याने असंख्य शेतकऱ्यांना रात्रीला पिकांना पाणी द्यायला जावे लागते. वेळीच वीज कंपनीने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा सुधाकर कळसकर, राजू कळसकर, ज्ञानेश्वर कोरडे, हरिनारायण देशमुख, बाळु बरडे, अरविंद शेरकी, आनंद कळसकर, राजू सवाईमूल, वर्षा मेश्राम, विलास खारकर आदींनी दिला आहे.
रबी पीकही संकटात; ट्रान्सफॉर्मरची समस्या
By admin | Updated: November 4, 2014 00:59 IST