नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रांवरील हलगर्जीचा विद्यार्थ्यांना फटका बसताना दिसत आहे. परंतु सावनेरमधील एका परीक्षा केंद्रावर एकच विद्यार्थी असूनही नियोजन विस्कटल्याचे दिसून आले. संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचलीच नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ उडाली. विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना ३० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. सावनेर येथील भालेराव विज्ञान महाविद्यालय हे परीक्षेचे केंद्र आहे. येथे दुपारी २ ते ५ या कालावधीत इंग्रजी साहित्य या विषयाचा पेपर होता. या पेपरसाठी एकच परीक्षार्थी होता. परंतु पेपरची वेळ आली तरी प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रप्रमुखांनी लगेच फोनाफोनी सुरू केली व विद्यापीठाशी संपर्क साधला. लगेच जवळील परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रिकेची छायाप्रत आणण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी २० मिनीटे लागली व विद्यार्थ्याला अर्धा तासानंतर पेपर सोडविण्याची संधी मिळाली. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाच्या परीक्षांमधील यंत्रणा चोख असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. परंतु परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात परीक्षा केंद्रावरील घोळ समोर येत असल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचलीच नाही
By admin | Updated: November 5, 2015 03:25 IST