तज्ज्ञांचे आवाहन : ‘घर पाहावे बांधून’ यावर चर्चासत्रनागपूर : प्लॉट खरेदी करताना प्लॉट विषयीचे सर्व कागदपत्र, नकाशा याची पाहणी करा. तसेच फ्लॅट घेताना संबंधित बिल्डरने आधी कुठे फ्लॅट विकले आहेत याच्या चौकशीनंतर तेथील ग्राहकांना विचारपूस करूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्या, असे आवाहन मान्यवर तज्ज्ञांनी आज येथे केले.असोसिएशन आॅफ कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअर्सच्या (इंडिया) वतीने अभियंता दिनानिमित्त पी. टी. मसे स्मृतिप्रीत्यर्थ सायंटिफिक सभागृहात ‘घर पाहावे बांधून’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रात आर्किटेक्ट वसंत रानडे, अभियंता सतीश साल्पेकर, अभियंता श्रीनिवास वर्णेकर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आर्किटेक्ट वसंत रानडे म्हणाले, फ्लॅट खरेदी करताना बिल्डरची आधीची कामे तपासून बिल्डरच्या जुन्या स्कीममधील ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे. फ्लॅट घेताना आपली गरज, पैसे, कोणत्या भागात फ्लॅट हवा या सर्व बाबींचा विचार महत्त्वाचा आहे. फसवणूक होऊ नये यासाठी पैसे खर्च झालेत तरी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला महत्त्वाचा आहे. अभियंता श्रीनिवास वर्णेकर म्हणाले, जेथे फ्लॅट घ्यायचा तेथून शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक जवळ आहे काय याचा विचार करा. प्लॉट घेऊन घर बांधायचे झाल्यास आधी जागा निवडून आर्किटेक्टकडे जा. तुमच्या गरजांची माहिती आर्किटेक्टला देऊन त्यानंतर स्ट्रक्चरल डिझायनर, प्लम्बिंग कन्सलटंट, एअर कंडिशनिंग कन्सलटंटची मंजुरी घेऊन बांधकाम सुरूकरा. अभियंता सतीश साल्पेकर म्हणाले, जमीन खरेदी करताना त्याची मालकी तपासणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर भूखंड क्रमांक, नगर भूमापन क्रमांक, ड्रॉईंग शीटचा क्रमांक, प्रभाग क्रमांक यामुळे जमीन कुठे आहे हे ओळखणे सोपे होते. याशिवाय त्या जमिनीचा ३० वर्षाचा इतिहास तपासणे महत्त्वाचे आहे. मूळ जमीन कृषिपयोगी असल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेचजमीन ग्रामीण भागातील असल्यास चालू महिन्यातील सातबाराचा उतारा, चालू महिन्यापर्यंत सर्व बिले, टॅक्स भरलेला आहे का हे पाहणे आवश्यक आहे. याशिवाय प्रॉपर्टी कार्ड, टॅक्सच्या पावत्या, अग्निशमन कायद्यानुसार,लिफ्ट लावायची असल्यास लिफ्ट मॅनेजरची परवानगी पाहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. प्रास्ताविक संदीप शिरखेडकर यांनी केले. सारंग परांजपे यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर तर प्रशांत कठाळे यांनी पी. टी. मसे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)
मालमत्ता खरेदीप्रसंगी करा कागदपत्रांची तपासणी
By admin | Updated: September 19, 2014 00:56 IST