नागपूर : नरखेड तालुक्यातील उमठा येथे घडलेल्या हत्याप्रकरणातील आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. उमेश चिंबा राऊत (१९) असे आरोपीचे नाव असून तो उमठा येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने २२ नोव्हेंबर २0११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३0४-२ (सदोष मनुष्यवध) अन्वये दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड आणि दंड भरला नाही तर ३ महिने साधा कारावास, अशी शिक्षा ठोठावली होती. उमेशचा भाऊ रत्नाकर व वडील चिंबा यांना भादंविच्या कलम १0९, ३२५ अन्वये दोषी ठरविण्यात आले होते. उमेशने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी त्याचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सुधाकर नेहारे असे मृताचे नाव आहे. खटल्यातील माहितीनुसार, ३0 डिसेंबर २0१0 रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास सुधाकर स्वत:च्या घराजवळ बाबू राऊतसोबत बोलत रोडवर उभा होता. आरोपींनी तेथे येऊन सुधाकरला शिवीगाळ केली. उमेशने सुधाकरला ढकलून खाली पाडले. त्याचवेळी अन्य दोन आरोपींनी उभारी आणून उमेशला दिली. उमेशने सुधाकरच्या डोक्यावर उभारीचा जोरदार प्रहार केला. यामुळे सुधाकर बेशुद्ध झाला. त्याला सुरुवातीला जलालखेडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर नागपुरातील मेडिकलमध्ये हलविण्यात आले. दुसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. सुधाकरची पत्नी बेबीच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसांनी आरोपींना गुन्हा नोंदवून अटक केली. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते.(प्रतिनिधी)
हत्याप्रकरणात शिक्षा कायम
By admin | Updated: June 2, 2014 02:19 IST