निशांत वानखेडे, नागपूर : धरणे आंदाेलन सुरू असलेल्या यशवंत स्टेडियम परिसरात एका महिलेने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने मंगळवारी एकच खळबळ उडाली हाेती. ही महिला पुणेलगतच्या खराडी परिसरातील डाॅ. आंबेडकर वसाहतीमधील रहिवासी आहे. या वस्तीत यावर्षी मार्च महिन्यात अग्नितांडव घडले हाेते, ज्यात या महिलेच्या दाेन मुलांचा हाेरपळून जीव गेला. ‘माझी दाेन लेकरं आगीत जळाली, मी जगून काय करू’, असा आक्राेश करीत तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी बुजरूकच्या अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या बॅनरखाली डाॅ. आंबेडकर वस्तीतील शंभरेक लाेक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी पाेहचले आहेत. आपल्या आंदाेलनाला ‘आत्मदहन आंदाेलन’ असे नावच त्यांनी ठेवले आहे. समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन हाेत आहे. त्यांच्यासाेबतच सीताबाई दांडे ही महिला देखील सहभागी आहे. मार्च महिन्यात पहाटेच्या ३ ते ४ वाजतादरम्यान खराडीच्या डाॅ. आंबेडकर वस्तीत अचानक आग लागली हाेती. पाहता पाहता ही संपूर्ण वस्ती जळून खाक झाली. लाेकांचे सर्व साहित्य या आगीत भस्म झाले, पण सीताबाई यांची गाढ झाेपेत असलेल्या दाेन तरूण मुलांचा आगीत हाेरपळून मृत्यु झाला. आता मागे कुणीच उरले नसल्याने त्या आक्राेश करीत आहेत.
या घटनेपासून वस्तीतील नागरिक सातत्याने पुणे महापालिका कार्यालय, तर कधी मुंबईत आंदाेलन करीत आहेत. मात्र गरीबांची दखल घेतली जात नसल्याचा आराेप करीत नागपुरात शेवटचे आंदाेलन करीत असल्याचे सांगितले. आंदाेलकांनी न्याय द्या, अन्यथा आम्ही आत्मदहन करू, असा इशाराच सरकारला दिला आहे. जळीतग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी, एसआरए रद्द करून त्याच जागेचे मालकी पट्टे देण्यात यावे, या मागण्या त्यांनी केल्या आहेत.दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास सीताबाई यांच्या आत्मदहन करण्याच्या प्रयत्नामुळे परिसरात चांगलीच तारांबळ उडाली हाेती. पाेलिसांनी वेळीच महिलेस पकडल्याने पुढचा अनुचित प्रकार टळला. मात्र संवेदनशील परिस्थिती पाहता बंदाेबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Web Summary : A Pune woman, who lost her two children in a fire, attempted self-immolation during a Nagpur protest, demanding compensation and land rights for fire victims. Police intervened, averting tragedy. The group seeks justice after a devastating fire.
Web Summary : पुणे में आग में दो बच्चों को खोने वाली महिला ने नागपुर में मुआवजे और भूमि अधिकारों की मांग करते हुए आत्मदाह का प्रयास किया। पुलिस ने हस्तक्षेप कर त्रासदी को टाला। समूह आग पीड़ितों के लिए न्याय चाहता है।