नागपूर : दोन दिवसाचे अधिवेशन ठेवून राज्य सरकारने जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढला असा आरोप करीत लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
स्मारक समितीचे संयोजक ॲड. अविनाश काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोरोनाचे कारण दर्शवित महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे केले. या उलट केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन १९ दिवसांचे असून १७ जुलैपासून सुरू झाले आहे. कोरोना काळातील नियमांचे पालन करून राज्य सरकारलाही हे शक्य होते. मात्र त्यांनी जनतेच्या प्रश्नांपासून पळकाढू धोरण अवलंबले. विदर्भातील अनेक प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. हे सरकार सुधारणावादी असल्याचे ढोंग करणारे आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. आंदोलनात वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय विचार मंचचे कार्यकर्ते सतीश कोहळे, दिलीप ठाकरे, सुनील किटकरू, प्रतीक करमरकर, अशोक कोल्हे, अमरित दिवाण, वर्षा धारगावे,अधिराज थुल, गौतम भीडे, नितेश सवाईकर, सोनु बागडे, प्रसेनजित गजभिये, प्रतिक वंजारी, शुभम वंजारी, सुनील रामटेके आदींचा सहभाग होता.