जलालखेडा : जलालखेडा बसस्थानक नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. यावेळी येथील बसस्थानकावर रात्रीच्या वेळी लाईट बंद राहत असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी त्रस्त आहेत. यासोबतच बसस्थानक परिसरातील वाढत्या दुर्गंधीबाबत स्थानिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
जलालखेडा हे नरखेड तालुक्यातील बाजारपेठेचे शहर आहे. जवळपास ३० ते ४० गावातील नागरिक दररोज विविध कामानिमित्त जलालखेडा येथे येतात. तसेच येथील सोमेश्वर किल्ला देवस्थान परिसरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. ग्रामीण भागातील नागरिकांना जलालखेडा येथे येण्यास महामंडळाची बस वाहतुकीसाठी महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. रात्री-अपरात्री महिला-मुलींना बसच्या प्रतीक्षेत स्थानकावर थांबावे लागते. मात्र गत आठ दिवसापासून येथील लाईट बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नियमित सफाई आवश्यक
जलालखेडा येथील बसस्थानकावर नेहमी अस्वच्छता पाहायला मिळते. सर्वत्र कचरा पसरलेला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेले स्वच्छतागृह अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात नेहमीच घाण दिसून येते. येथे नियमित सफाई होणे गरजेचे आहे.
बसस्थानकावर लाईट नसणे दुर्दैवी आहे. शेकडो महिला प्रवासी बसस्थानकावर असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट असणे गरजेचे आहे. याबाबतीत संबंधितांना फोन करून तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
- प्रीतम कवरे, जि.प. सदस्या.
--
बसस्थानकावर लाईट नसल्याची माहिती नव्हती. परंतु शनिवारला सकाळी याबाबत माहिती मिळाली. लाईट नसल्याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्याची होती. परंतु त्यांनी याबाबत कसलीही माहिती दिली नाही. माहिती मिळताच दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
- एफ. रंगारी, आगार व्यवस्थापक, काटोल.