लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट परफ्यूम आणि बॉडी स्प्रे तयार करणाऱ्या खामल्यातील कारखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांना ५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल सापडला.
एक्स कंपनीचे बनावट परफ्यूम आणि बॉडी स्प्रे तयार करून ते बाजारात विकले जात असल्याची तक्रार एक्स कंपनीचे प्रतिनिधी अनुप संभाजी कोलप (वय ४३, रा. मुंबई) यांनी प्रतापनगर पोलिसांकडे नोंदवली. त्या माहितीवरून पोलिसांनी खामल्यातील अशोक कॉलनीत राहणारा आरोपी संजयकुमार शर्मा (वय २२) याच्या घरावर गुरुवारी छापा घातला. यावेळी पोलिसांना एक्स कंपनीचे बनावट परफ्यूम तसेच बॉडी स्प्रे आढळले. पोलिसांनी जवळपास ५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडल एकचे उपायुक्त नुरूल हसन, प्रतापनगरचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष विठ्ठल बोयणे, उपनिरीक्षक साईनाथ बारगळ, हवालदार दिनेश बावणकर, चंद्रमणी सोमकुंवर, मनोज निमजे, गजानन पवार, स्वप्निल करंडे, सारंग भरबत, चेतन चाैधरी, धर्मेंद्र यादव, पल्लवी तुरणकर यांनी ही कामगिरी बजावली.
----
भंगारवाल्याकडून खरेदी
आरोपी शर्मा हा मूळचा सतना, मध्य प्रदेशमधील रहिवासी असून, त्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हा गोरखधंदा सुरू केल्याचे समजते. ब्रॅण्डेड कंपनीचे परफ्यूम आणि बॉडी स्प्रेच्या खाली बाटल्या तो भंगारवाल्यांकडून विकत घेत होता. त्यात बनावट परफ्यूम भरून ते तो छोटे दुकानदार, फुटपाथवर दुकान थाटणारांना विकत होता. भरपूर मार्जिन मिळत असल्याने त्याचा धंदा चांगला चालत होता. मात्र, कंपनीच्या एजंटकडे तक्रारी आल्याने आरोपी शर्माच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला.
----