नागपूर : भांडेवाडी येथे कार्यरत प्राण्यांच्या शेल्टर होममधील अव्यवस्थेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सहावे प्रतिवादी म्हणून प्राणी अत्याचार प्रतिबंध समिती अध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे. न्यायालयाने या दुरुस्तीला अनुमती देऊन नवीन प्रतिवादीला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर १९ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.अंकिता शाह असे याचिकाकर्तीचे नाव आहे. भांडेवाडीतील शेल्टर होमची अतिशय दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा नाहीत. यामुळे सर्व जखमी व आजारी जनावरांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयांत स्थानांतरित करण्यात यावे, बेवारस कुत्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, जनावरांसाठी तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, हेल्पलाईन सुरू करण्यात यावी, निष्काळजीपणामुळे जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, प्रत्येक झोनमध्ये १० ते २० हजार चौरस फूट जागा जनावरांसाठी राखीव ठेवण्यात यावी, जनावरांचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, जनावरे दूषित अन्न सेवन करू नये यासाठी शहरात स्वच्छता ठेवण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. मनपाने प्रतिज्ञापत्र सादर करून भांडेवाडी येथे अत्याधुनिक शेल्टर होम व रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पावर ७ कोटी १७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
प्राणी अत्याचार प्रतिबंध समिती प्रतिवादी
By admin | Updated: August 12, 2015 03:30 IST