ग्रीन व्हिजिल संस्थेचा पुढाकार : शनिवारी ७८ मूर्तींचे विसर्जन नागपूर : नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजिल स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून फुटाळा तलाव परिसरात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सज्ज करण्यात आले आहेत. यात शनिवारी दीड दिवसांच्या ७८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, दरवर्षी फुटाळा तलावात हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केल्या जाते. त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणी दूषित होऊन तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील हा धोका टाळण्यासाठी मनपा व ग्रीन व्हिजिल या संस्थेच्यावतीने येथे दोन कृत्रिम तलाव सज्ज करून नागरिकांना त्यात गणपती विसर्जन करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार शनिवारी ग्रीन व्हिजिलच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर येथे उपस्थित राहून नागरिकांना कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करण्यास प्रोत्साहित केले. यात संस्थेचे प्रमुख डॉ. कौस्तुभ चॅटर्जी यांच्यासह दक्षा बोरकर, सुरभी जयस्वाल, राहुल राठोड, नीलेश मुनघाटे, नजमा खान, शुभम येरखेडे, कुमारेश टिकाधर, हेमंत अनेसार, प्रांजली कदम, सोनल घोरडकर, विष्णुदेव यादव व दादाराव मोहड यांनी भाग घेतला होता. यापुढे ३१, २, ४ व ८ आॅगस्ट रोजीसुद्धा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. चॅटर्जी यांनी दिली. मनपाचे साफसफाई अभियान नागपूर महानगरपालिकेच्यावतीने गत २६ आॅगस्टपासून फुटाळा तलाव येथे विशेष साफसफाई अभियान सुरू करण्यात आले आहे. यात आतापर्यंत तलावातील तब्बल ३४ टन कचरा बाहेर काढून, त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती मनपाचे अधिकारी डी. पी. टेंभेकर यांनी दिली. ते म्हणाले, पुढील दहा दिवसांपर्यंत हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे. शिवाय गणपती विसर्जनानंतर पुन्हा तीन विशेष अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात मनपाचे अधिकारी मनीष शुक्ला यांच्यासह इतर कर्मचारी मोलाची भूमिका बजावत आहेत.
फुटाळा येथे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सज्ज
By admin | Updated: August 31, 2014 01:16 IST