बंदोबस्त अधिकच कडक: ठिकठिकाणी सशस्त्र पहारानागपूर : याकूब मेमनला फाशी दिली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. संवेदनशील स्थळांवर अतिरिक्त सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला असून, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकानेही बुधवारी रात्रीपासून जागोजागी तपासणी सुरू केली आहे.याकूब मेमनने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यापूर्वीच ‘डेथ वॉरंट’ बेकायदेशीर आहे, असे सांगणारी याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढली. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी कारागृह प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वत्र तणावसदृश स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागपुरातील बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. कारागृहाच्या आत बाहेरच नव्हे तर शहरातील सर्वच संवेदनशील स्थळे आणि वस्त्यांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठा आणि मॉलसह ठिकठिकाणच्या गर्दीच्या ठिकाणी बुधवारी दिवसभर श्वानपथक आणि बॉम्बशोधक तसेच नाशक पथकाने (बीडीडीएस) कसून तपासणी केली. (प्रतिनिधी)संघ मुख्यालयाला अतिरिक्त कवच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या संघ मुख्यालयाला अतिरिक्त सशस्त्र सुरक्षा कवच देण्यात आले आहे. संघ मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात साध्या वेशातील पोलीस तैनात आहेत. या शिवाय दीक्षाभूमी आणि अन्य संवेदनशील स्थळे तसेच संवेदनशील वस्त्यांमध्येही पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. है तय्यार हम ! : पोलीस आयुक्त उपराजधानीत बंदोबस्त कडक असून, खबरदारीच्या सर्व उपाययोजना आम्ही केल्या आहेत. आम्ही कोणतीही स्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
उपराजधानीत अलर्ट
By admin | Updated: July 30, 2015 02:40 IST