हायकोर्ट : हनुमान चालिसा पठणाचे प्रकरणनागपूर : कस्तूरचंद पार्कवर ७ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, असा दावा करून नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर आता उन्हाळ्याच्या सुट्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात सहभागी होणार नाही व या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे व्यापक प्रसिद्धीसह जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखविली होती. त्यापूर्वी एड्स जनजागृती व हनुमान चालिसा पठण कार्यक्रम एकत्र घेण्यात येणार असल्याची जाहिरात करण्यात आली होती. यामुळे मून यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या दणक्यानंतर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती कार्यक्रम तर, नगरसेवक दयाशंकर तिवारी व पोद्दारेश्वर राम मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रम स्वतंत्रपणे होतील व एड्स जनजागृती कार्यक्रम संपल्यानंतर एक तासानी हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने एड्स जनजागृती कार्यक्रम सुरू असताना हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे तर, हनुमान चालिसा पठण कार्यक्रम सुरू असताना एड्स जनजागृती कार्यक्रमाचे बॅनर्स लावू नका असे स्पष्ट केले होते. या आदेशाचे पालन झाले नाही, असे मून यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
प्रवीण दटके, दयाशंकर तिवारींना नोटीस
By admin | Updated: April 16, 2016 02:28 IST