महापौर, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आरटीओने काढले दिवे नागपूर : ‘व्हीआयपी कल्चर’ला चाप बसण्यासाठी लाल दिवा हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मात्र, राज्यस्तरावर हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. लेखी आदेशच नसल्याने ज्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर दिवा आहे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी महापौर, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गुरुवारी कार्यालयात आल्या आल्या स्वत:हून अंबर दिवा काढून घेतला. हे वृत्त बाहेर पडताच त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी विशेषत: आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आपापले दिवे काढून घेतल्याची माहिती आहे.कामगार दिन म्हणजेच १ मे पासून पंतप्रधानांसह देशभरातील मंत्री किंवा अधिकारी गाड्यांवर लाल दिवा लावू शकणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी हा निर्णय होताच पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच वाहनावरील दिवे काढले. परंतु राज्यस्तरावर याबाबत कुठलाही निर्णय किंवा अधिसूचना निघालेल्या नाहीत. असे असताना केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी राज्यस्तरावरील निर्णयाची वाट न पाहता आपल्या वाहनावरील अंबर दिवा काढला. या सोबतच विभागीय आयुक्त अनुप कुमार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, दोन्ही आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनीही आपला दिवा काढून टाकला आहे. (प्रतिनिधी)दिवा नसलेल्या गाडीने महापौर सभेला महालातील नगरभवनात गुरुवारी आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर हे गुरुवारी दिवा नसलेल्या गाड्यांनी आले. केंद्र सरकारच्या निर्णयाला प्रतिसाद देत महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला. त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रतिष्ठेची लालबत्ती गुल
By admin | Updated: April 21, 2017 02:57 IST