नागपूर : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश पी. व्ही. गणेडीवाला यांच्या न्यायालयाने खुद्द आरोपी वडिलाला पाच वर्षे सश्रम कारावासची शिक्षा सुनावली.अजय हरिश्चंद्र ढेंगरे (४२) , असे आरोपचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशालीनगर येथे राहायचा. पीडित मुलगी ही लहानपणापासूनच आपल्या मामाकडे राहात होती. घटनेच्या दोन वर्षांपूर्वीपासून ती पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली होती. ती अकराव्या वर्गात शिकत होती. दुर्दैवी रात्री ९ आॅगस्ट २०१६ रोजी ती घरात झोपलेली असताना अजयने तिचा विनयभंग केला होता. १५ आॅगस्ट रोजी याच कारणांवरून तिला मारहाण केली होती. वारंवार तो तिला धमक्याही देत होता. भयग्रस्त होऊन ती आपल्या मावशीकडे राहण्यासाठी गेली असता तेथेही त्याने मारहाण केली होती. पीडित मुलीने चाईल्ड लाईनच्या मार्फत पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच भादंविच्या ३५४, ३२३, ५०४ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या ७, ८ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक करण्यात आली होती. पीडित मुलीला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केंचे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने चार आणि बचाव पक्षाच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी पित्याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता पवार यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. घिरडे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुरेश शेंडे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
पोक्सोत वडिलाला पाच वर्षे कारावास
By admin | Updated: June 21, 2016 02:46 IST