वीज कनेक्शनचा तिढा : वीज ग्राहकांनी केला घेराव नागपूर : नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याच्या तक्रारीसह शेकडो वीज ग्राहकांनी सोमवारी छापरू नगर येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेड (एसएनडीएल)च्या कार्यालयावर धडक देऊन एसएनडीएल अधिकाऱ्यांचा घेराव केला. यामुळे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर एसएनडीएल कार्यालयात पोलिसांना तैनात करण्यात आले होते. वीज ग्राहकांच्या मते, एसएनडीएल कर्मचारी आवश्यक दस्तऐवज सादर करू नही नवीन वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करीत आहे. शिवाय दलालांच्या माध्यमातून डिफॉल्टर वीज ग्राहकांनासुद्धा त्वरित नवीन कनेक्शन दिले जात आहे. हंसापुरी येथील सचिन कमल गुप्ता यांनी दीड वर्षांपूर्वी नवीन वीज कनेक्शनसाठी कागदपत्रांसह एसएनडीएलकडे आवेदन सादर केले. परंतु एसएनडीएल कंपनीचे कर्मचारी दुसऱ्याच गुप्ता नावाच्या व्यक्तीवर हजारो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याचे कारण सांगून त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. जेव्हा की, सचिन गुप्ता यांचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसेच चंद्रकला पावडे यांनीही दोन महिन्यांपूर्वी नवीन कनेक्शनसाठी आवेदन केले. परंतु त्यांनाही अजूनपर्यंत कनेक्शन देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांची एसएनडीएल कार्यालयावर धडक
By admin | Updated: July 7, 2015 02:54 IST