नागपूर : १५ मार्चपासून शहरात लागणाऱ्या लॉकडाऊनचा नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) विरोध केला आहे. शनिवारी एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना व्यापाऱ्यांच्या हितार्थ लॉकडाऊन स्थगित करण्याची मागणी केली आहे.
मेहाडिया यांचे म्हणणे आहे, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. गेल्यावर्षी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असल्याने व्यापारी आर्थिक संकटात आला होता. आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. लॉकडाऊनमध्ये लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सूक्ष्म उद्योजकांना स्थायी खर्च करावाच लागणार आहे. अशात मार्च एंडिंग असल्याने व्यापाराचा वर्षभराचा लेखाजोखा वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. नागपुरात पूर्ण लॉकडाऊन न करता जे लोक अथवा प्रतिष्ठान कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
यासंदर्भात पालकमंत्री राऊत म्हणाले संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. यात सर्वाधिक संक्रमित रुग्ण नागपुरात वाढत आहे. मला व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणिव आहे. मी सुद्धा लॉकडाऊनच्या बाजूने नाही. परंतु वाढत्या संक्रमणामुळे लोकांचा जीव वाचविणेही गरजेचे आहे. त्यासाठी लॉकडाऊन शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. संक्रमितांच्या संख्येच्या आधारावर २१ मार्चनंतर शहरात लॉकडाऊनबाबत पुन्हा विचार करण्यात येईल.
पालकमंत्र्यांची भूमिका मान्य करीत चेंबरचे अध्यक्ष मेहाडिया व अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यापारी व जनतेस आवाहन केले की, कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे.