औषध कंपनीच्या सेल्समनला अटक : तीन महिन्यांपासून देत होता त्रास नागपूर : महिलांना व्हॉटस् अॅपवर अश्लील मॅसेज व फोटो पाठविणाऱ्या एका औषध कंपनीच्या सेल्समन युवकला अजनी पोलिसांनी अटक केली. हा आरोपी युवक गेल्या तीन महिन्यांपासून महिलांना त्रास देत होता. पीयूष जयंत महालक्ष्मे (२९) रा. खडगाव रोड वाडी, असे आरोपीचे नाव आहे. अजनी परिसरातील एका युवतीला काही दिवसांपूर्वी व्हॉटस् अॅपवर अश्लील मॅसेज आणि फोटो आला. मॅसेज व फोटो पाहून युवती चक्रावली. तिने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी मोबाईल नंबरच्या आधारावर मॅसेज पाठविणाऱ्यास शोधून काढले. त्या व्यक्तीने वाडी परिसरात त्याचा मोबाईल हरविल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने नवीन नंबर घेतला, त्यामुळे चोरी झालेला मोबाईल नंबर व सीमबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्स’च्या मदतीने आरोपीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. चोरी गेलेला मोबाईल व सीम पीयूष वापरत हेता. तो औषध कंपनीत सेल्समनचे काम करतो. दिवसभर शहरात फिरत असल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन शोधायला वेळ लागला. यादरम्यान पीयूषने एका गुन्ह्यात वापरण्यात आलेले सीमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकून मॅसेज व फोटो पाठविले. पोलिसांना त्याच्या मोबाईलचा पत्ता लागला. पोलिसांनी पीयूषचा बायोडाटा काढला. तकारकर्त्या युवतीशिवाय त्याने इतर अनेक महिलांनाही याचप्रकारे मॅसेज व फोटो पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी जेव्हा महिलांना यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा त्यांनी कबुली दिली. या आधारावर अजनी पोलिसांनी मंगळवारी रात्री पीयूषला अटक केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांकडे सबळ पुरावा असल्याने त्याने कबुली दिली. पीयूषनुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तो हे कृत्य करीत होता. त्याचे म्हणणे आहे की, त्याला हे दोन्ही सीमकार्ड व मोबाईल बेवारस अवस्थेत सापडले. त्यामुळे त्याने त्याचा असा उपयोग करायला सुरुवात केली. महिलांशी जवळीक साधण्यासाठी त्याने परिचित महिलांना व्हॉटस् अॅपवर अश्लील मॅसेज पाठविणे सुरू केले. पीडित युवतीशीसुद्धा त्याची ओळख होती. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेष शंखे, जी.जे. पाटील, एपीआय एस.के. धोबे, कर्मचारी मनोज, नीलेश्वर, तारा सिंह, भगवती तथा गायत्री यांनी केली. (प्रतिनिधी)
‘व्हॉटस् अॅप’वर पाठविले अश्लील मॅसेज
By admin | Updated: January 12, 2017 01:38 IST