लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील कळमेश्वर व माेहपा परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली असून, त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. राेडवरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, शासनाकडून निधी प्राप्त हाेत नसल्याने राेडची दुरुस्ती करणे शक्य हाेत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील कोहळी-सुसुंद्री-मोहपा, रामगिरी-बुधला-लोहगड, मोहपा-कळमेश्वर, मोहपा-धापेवाडा, मोहपा-तेलगाव या महत्त्वाच्या रस्त्यांची लांबी ६० ते ८० किमी असून, या रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहने चालिवताना चालकांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे हे सर्व मार्ग रहदारीचे आहेत. कारण, ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना कळमेश्वर व सावनेर शहरात ये-जा करण्यासाठी या मार्गांचा वापर करावा लागताे.
दहेगाव-खडगाव-कळमेश्वर-नागपूर या मार्गाचीही दैनावस्था झाली आहे. या मार्गावरून २४ तास जड वाहतूक सुरू असते. भरधाव वाहनांच्या चाकांमुळे राेडवरील गिट्टी उडत असल्याने ती धाेकादायक ठरत आहे. शिवाय, राेडवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तोंडाखैरी-बोरगाव-कळमेश्वर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, कामाचा वेग अतिशय संथ असल्याने वाहनचालकांसह नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे शासनाने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
....
अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था
कळमेश्वर तालुक्यातील अतंर्गत छाेटे रस्तेही व्यवस्थित राहिले नाहीत. दुरवस्था झालेल्या रस्त्यांमध्ये सावंगी-लोणारा, कळमेश्वर-लिंगा, कळमेश्वर-खैरी (लखमा), धापेवाडा-निळगाव, खडगाव-साहुली, सेलू-कळंबी-साहूली, मढासावंगी जोडरस्ता, आष्टी (कला)- निमजी, सावनेर-निळगाव, नागपूर-काटोल महामार्गापासून घोराड-उबाळी-मोहपा मार्ग, सोनपूर-येरणगाव, सेलू-गुमथळा, कळमेश्वर-झुनकी-सिंधी, तिष्टी (बु)-पिपळा (किनखेडे), उबाळी-सावळी स्मशानभूमी रस्ता, मोहपा-बुधला-लोहगड या रस्त्यांचा समावेश आहे. याही रस्त्यांची लांबी अंदाजे ६० ते ८५ किमी आहे.