केवळ ४६ टक्केच अर्ज दाखल : १३ हजाराहून अधिक जागा राहणार रिक्त योेगेश पांडे ल्ल नागपूर‘रिकाम्या जागा कशा भरायच्या?’ नागपूर विभागातील ‘पॉलिटेक्निक’च्या महाविद्यालयांसमोर हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ४६ टक्के अर्ज आले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांचा निरुत्साह कायमच राहिला. यंदा १३ हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार एआरसीमध्ये अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ जून होती. नागपूर विभागातील सर्व ६८ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २५,२८५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी केवळ १३ हजार ९७८ ‘अप्लिकेशन किट्स’ची विक्री झाली. त्यापैकी केवळ ११ हजार ६७४ अर्ज आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ४६.१८ टक्के आहे. ंमागील वर्षीपेक्षा १७ टक्के कमी अर्जपॉलिटेक्निक प्रवेशाबद्दल दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होत चालला आहे. गेल्या वर्षी नागपूर विभागातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील २६ हजार ३३० उपलब्ध जागांसाठी केवळ १६ हजार ७३४ अर्ज आले होते व याची टक्केवारी काढली असता ती ६३.५५ टक्के इतकी होती. यंदा त्यातदेखील जवळपास १७.३७ टक्क्यांची घट दिसून आली आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीहून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार हे निश्चित. मागील वर्षी ९०० १ जागा रिक्त होत्या.रिकाम्या जागा भरायच्या कशा?‘पॉलिटेक्निक’च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकरिता दोन वर्षांअगोदर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाची मर्यादा ३५ टक्क्यांवर घसरवण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास विभागाला अपयश आलेले आहे. ‘पॉलिटेक्निक’च्या अभ्यासक्रमाचे भरमसाट शुल्क भरूनदेखील विद्यार्थ्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. अनेकांना तर कॅम्पस मुलाखतींदरम्यान १० हजारांच्या आतीलच नोकरी देण्यात आली होती. यामुळेच ३५ टक्क्यांची आॅफरदेखील फ्लॉप झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता रिकाम्या जागा भरायच्या कशा असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा झाला आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘पॉलि’चे ‘टेक्निक’ बिघडले
By admin | Updated: June 30, 2015 03:14 IST