उमरेड : उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होताच दावे - प्रतिदाव्यांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी ११ ग्रामपंचायतीत काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे माजी आमदार सुधीर पारवे यांनीसुद्धा १२ ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा केला आहे. सोबतच प्रहार जनशक्ती, शिवसेना यांनीही दावे - प्रतिदावे केल्याने १४ ग्रामपंचायतींवर सत्तास्थापनेसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक आटोपताच आता सरपंच पदाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या असून, ज्या पक्षाचा सरपंच त्याचाच दावा खरा असे समीकरणसुद्धा येत्या काही दिवसात बघावयास मिळणार आहे. भाजपने १२ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. यामध्ये खुसार्पार (बेला), शिरपूर, बोरगाव लांबट, कळमना (बेला), खैरी (चारगाव), नवेगाव साधू, चनोडा, किन्हाळा (सिर्सी), शेडेश्वर, सावंगी खुर्द, विरली, मटकाझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुसार्पार (उमरेड) या ग्रामपंचायतीवर प्रहार जनशक्तीचे संदीप कांबळे यांनी ९ पैकी ८ उमेदवार विजयी ठरल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार राजू पारवे यांनीसुद्धा उमरेड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीत काँग्रेसला बहुमत असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नवेगाव साधू, मटकाझरी, विरली, शेडेश्वर, सालईराणी, बोरगाव लांबट, खुसार्पार (उमरेड), शिरपूर, किन्हाळा, खैरी (चारगाव), चनोडा या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींच्या बहुमतावर पॉलिटीकल वॉर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST