नागपूर : धंतोली पोलिसांनी बुधवारी ‘जेलब्रेक’ मॉकड्रील केली. त्यांनी गणेश शर्मा याच्याकडून कारागृहातील पाच खतरनाक कच्चे कैदी सुरक्षितपणे पळून गेलेल्या मार्गाची माहिती घेतली. कारागृह प्रशासनाकडून उशिरा सूचना देण्यात आल्याने सर्व पाचही जण सुरक्षित रवाना झाले. यात कारागृह प्रशासनाचाच निष्काळजीपणा होता, असेही पोलिसांना समजले. रात्रीच्या वेळी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेतही त्रुट्या असल्याचे निदर्शनास आले. गणेश शर्मा याने पाचही गुन्हेगारांना आपल्या मोटरसायकलने मोमीनपुऱ्यात सोडले होते. धंतोली पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम माहीत करून घेतला. गणेश हा ३१ मार्च रोजी पहाटे ४ वाजता कारागृहानजीक दाखल झाला होता. त्याने आधी सत्येंद्र आणि शिबू या दोघांना मोटरसायकलवर मोमीनपुऱ्याच्या फुटबॉल मैदानात सोडून दिले. त्यानंतर त्याने बिसेन, गोलू आणि प्रेम या तिघांना याच मैदानात सोडले. त्यानंतर तो सत्येंद्रला सोबत घेऊन कामठी मार्गावरील आॅटोमोटिव्ह चौकातील त्याच्या बहिणीकडे घेऊन गेला. शिबू आणि अन्य तिघांना पायी कमाल चौकात येण्यास सांगण्यात आले होते. सत्येंद्रने आपल्या बहिणीकडून दीड हजार रुपये घेतले. गणेश हा इंदोरा चौकात आला होता. त्यावेळी अन्य चौघे कमाल चौकात पोहोचले होते. गणेशने पुन्हा या चौघांना इंदोरा चौकात आणले होते. सत्येंद्रने मध्य प्रदेशकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे गणेश हा आधी सत्येंद्र आणि शिबूला घेऊन मानकापूर चौकात दाखल झाला होता.त्यांना सोडून दिल्यानंतर त्याने उर्वरित तिघांना मानकापूर चौकात सोडून दिले होते. सकाळी ८ वाजता हे पाचही जण छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून रवाना झाले. कारागृह प्रशासनाने सकाळी ७ वाजता या कैद्यांच्या पलायनाची खबर दिली होती. शहर पोलिसांचीही तारांबळ उडाल्याने ते त्यावेळी शहर सीमा सील करू शकले नाहीत. त्यामुळे सर्व जण बिनधास्तपणे पसार झाले. गणेशने या पलायनाची चार तासपर्यंत तपशीलवार माहिती दिली. मात्र तो या पाचही जणांशी नंतर संपर्क झाल्याचा इन्कार करीत आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची ‘जेलब्रेक’ मॉकड्रील
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST