नागपूर : मिहान-सेझ परिसरात आता पोलिसांना लक्ष ठेवणे अधिक सोपे होणार आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी(एएडीसी)ने परिसरात पोलीस चौकीसाठी कक्ष उपलब्ध करून दिले आहे. फायर स्टेशनमध्ये हा कक्ष तयार होत असून बुधवारी या कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मिहानसाठी पोलीस चौकीचा प्रस्ताव जुना आहे. परंतु त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. परंतु वाढत्या चोरीच्या घटना आणि पोलिसांची गरज लक्षात घेऊन एमएडीसीतर्फे अस्थायी पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिहानमधील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. संपूर्ण मिहान-सेझ परिसरात चोरांचा आणि असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. मिहान परिसरातील लोखंडी साहित्य व केबल वायरसुद्धा चोरून नेले जात आहेत. एमएडीसीचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी सांगितले की, पोलीस चौकीसाठी फायर स्टेशनच्या इमारतीत तीन कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात वीज, पाणी, टेबलसह काही आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
मिहानमध्ये होणार पोलीस चौकी
By admin | Updated: March 6, 2015 00:24 IST