राजकीय आश्रय : अनेक अधिकार्यांची कार्यमुक्तीसाठी धडपड यवतमाळ : दुसर्या जिल्ह्यात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. नव्या जिल्ह्यात रुजू होणार्यांमध्ये पहिला क्रमांक लागावा म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे.महाराष्ट्र पोलीस दलात कनिष्ठ अधिकार्यांच्या बढत्या व बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात फौजदार, सहायक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पदोन्नतीवरील पोलीस उपअधीक्षक आदींचा समावेश आहे. एक तर या पोलीस अधिकार्यांनी सोईच्या ठिकाणी बदल्या होण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु अनेकांचा त्यात हिरमोड झाला. पाहिजे तो जिल्हा मिळू शकला नाही आणि आता त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याने या पोलीस अधिकार्यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी दर्शविली.अनेक जिल्ह्यात बदलीवरील अधिकार्यांना सोडण्यात आले असले तरी नागपूर ग्रामीण सारखे काही अपवाद असल्याचे सांगितले जाते. तेथील तीन अधिकार्यांना अद्यापही सोडले गेले नाही. नव्या जिल्ह्यात अधिकारी रुजू झाल्यास तेथील सोईच्या आणि वरकमाईच्या जागा भरल्या जातील, अशी भीती प्रत्येकच पोलीस अधिकार्याला असते. त्यामुळेच तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून या अधिकार्यांचा प्रयत्न असतो. कार्यमुक्त न झालेले अधिकारी कासावीस झाल्याचे चित्र आहे. नव्या जिल्ह्यात बदलून आलेल्या पोलीस अधिकार्यांनी सोईच्या व कमाईच्या पोलीस ठाण्यासाठी राजकीय मार्गाने फिल्डींग लावली आहे. बदलीवरील नव्या जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीपासून ही फिल्डींग लावली जाते. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय नेत्यांना हेरले जात आहे. पीएंमार्फत नेत्यांशी संधान बांधले जात आहे. सोईचे ठाणे मिळविण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त होणे आणि नव्या ठिकाणी रुजू होणे यावर भर दिला जातो. काहींनी राजकीय दलाल, पोलीस खात्यातीलच वरिष्ठ अधिकार्यांमार्फतच मोर्चेबांधणी चालविली आहे. तर अनेकांनी शक्य असेल तेथे रॉयल्टीचा मार्गही निवडला असल्याचे बोलले जाते. अ दर्जाचे ठाणे सांभाळण्याची चटक लागलेल्या पोलीस अधिकार्यांनी बदलीवर नव्या जिल्ह्यातसुद्धा अ दर्जाच आपल्या हाती रहावा म्हणून मिळेल त्या मार्गाने प्रयत्न चालविले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
बदलीवरील पोलीस निरीक्षकांची सोईच्या ठाण्यांसाठी फिल्डींग
By admin | Updated: June 4, 2014 01:05 IST