२० दिवसात पाचवी कारवाई : चारवेळा फक्त चालानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोलीतील बहुचर्चित निडोज बारमध्ये मागील २० दिवसांत पाचव्यांदा कारवाई झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. धंतोली पोलिसांनी १८ जूनच्या रात्री निडोज बारवर धाड टाकून विनापरवानगी सुरू असलेला आॅर्केस्ट्रा पकडला होता. मागील २० दिवसात निडोजविरुद्ध लागोपाठ कारवाई करण्यात येत आहे. परंतु आतापर्यंत एकदाच गुन्हा दाखल झाला आहे. चारवेळा फक्त चालानची कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या वारंवार कारवाईनंतरही त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.निडोज बारबाबत पोलिसांची नेहमीच मूकदर्शक अशी भूमिका राहिली आहे. उत्पादन शुल्क विभागही निडोजवर कारवाई करताना दिसत नव्हता. ३० जूनला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उत्पादन शुल्क विभागाने निडोजवर धाड टाकली. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडेसह केवळ एक-दोन अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांना सूचना दिली. या कारवाईत पोलिसांना अडीच लाखांची दारूआढळली. त्यांनी निडोजचे संचालक राजू जायसवालला अटक करून दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर १ जुलैला निडोजविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली. १५ जुलैला पुन्हा दुसऱ्यांदा चालानची कारवाई झाली. यानंतरही निडोजच्या संचालकावर काहीच परिणाम झाला नाही. परफॉर्मन्स लायसन्सविना येथे आॅर्केस्ट्रा सुरू होता. १८ जूनला धाड टाकून आॅर्केस्ट्रा पकडण्यात आला. पोलीस कारवाईनंतर कोणताही बार संचालक सतर्क होतो. परंतु निडोजचा संचालक त्यास अपवाद आहे. अशा स्थितीत पोलिसांची प्रभावी भूमिकाही महत्त्वाची आहे. निडोजविरुद्ध यापूर्वीही अनेकदा कारवाई झाली. काही काळापूर्वी नागपूर डान्सबारसाठी चर्चेत होते. तेव्हा निडोज बारही चर्चेत होता. परवाना रद्द करण्याची तयारी मुंबईनंतर नागपुरातील डान्स बारची चर्चा सर्वत्र होती. ३० जूनला उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. निडोजची पार्श्वभूमी माहिती असूनही कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर आरोप लावण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी चारवेळा चालानची कारवाई केली. आता पोलीस निडोजचा परवाना रद्द करण्याची तयारी करीत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे शहरातील इतर हॉटेल आणि बार संचालकात खळबळ उडाली आहे.
निडोज बारवर पोलिसांचा वरदहस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:38 IST