उपराजधानीत तगडा बंदोबस्त मिशन महापालिका गुन्हेगारावर राहणार वॉच सुरळीत पार पाडणार प्रक्रियानागपूर : महापालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासन सज्ज आहे. आम्ही सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली असून, मतदान ते मतमोजणी प्रक्रिया निर्भयपणे पार पडेल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी रविवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी आणि महापालिकेचे अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.नागपूर महापालिकेच्या एकूण ३८ प्रभागात १५१ जागांसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महपालिका आणि पोलीस प्रशासनाने काय तयारी केली, त्याची माहिती हर्डीकर आणि बोडखे यांनी पत्रकारांना दिली. मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक, सांपत्तीक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी एका फलकावर मतदान केंद्रावर बघायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. किती जणांवर आचारसंहितेचे उल्लंघन केले, किती जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, त्याबाबतचीही त्यांनी माहिती दिली. मात्र, किती उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, कुणावर प्रतिबंधक कारवाई झाली, ते सांगण्याचे या अधिकाऱ्यांनी टाळले. सोशल मीडियावरून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. भाषण ऐकवले जात आहे, मेसेज येत आहे, आवाहन केले जात आहे, यासंबंधाने काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असता सोशल मीडियावर नियंत्रण राखणे कठीणअसल्याचे हर्डीकर म्हणाले. मात्र, विविध पक्ष आणि उमेदवारांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. उल्लंघनासंदर्भात अनेक मुद्दे पत्रकारांनी उपस्थित केले असता तक्रार आल्यास कारवाई करू, असेही हर्डीकर म्हणाले. यावेळी सक्करदऱ्यात शनिवारी वाटल्या गेलेले कूपन्स तसेच तक्रारीचा मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर उत्तर देताना त्याची चौकशी सुरू असल्याचे हर्डीकर म्हणाले. शहरातील २० लाख ९३ हजार ३९२ मतदारांना घरोघरी मतदार स्लीपचे वाटप सुरू आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी या स्लीपचे वाटप पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मतदारांना लालूच आणि भीती दाखविण्यासाठी काही उमेदवार किंवा त्यांचे समर्थक दारू आणि शस्त्रांचाही वापर करतात. त्यामुळे पोलिसांनी दारू विक्रेत्यांसोबत अवैध शस्त्रधारकांवरही खास नजर रोखली असून, १२ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ३०० अवैध दारू विक्रीच्या आणि ७४ अवैध शस्त्रांच्या केसेस केल्या आहेत. रेकॉर्डवरील १२२५ पैकी १०९५ संबंधितांवर समन्स तामिळ करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गुन्हेगारांवर कारवाईपोलिसांच्या रेकॉर्डनुसार, शहरातील ५९ भागात १८९ उपद्रवी इसम आहेत. त्यातील १३९ इसमांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १५१२ जणांवर सीआरपीसी तर मुंबई पोलीस कायद्यानुसार ९६ जणांवर कारवाई केली. महापालिका निवडणुकीत आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ११७ लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात मालमत्ता विद्रुपीकरण प्रकरणातील ६६ जणांचा समावेश आहे.
पोलीस दक्ष, प्रशासन सज्ज
By admin | Updated: February 20, 2017 01:54 IST